‘शेल्टर’मधून नाशिक चे ब्रॅँडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:12 IST2017-10-28T23:24:16+5:302017-10-29T00:12:10+5:30
क्रेडाईतर्फे होऊ घातलेल्या शेल्टर प्रदर्शनातून नाशकातील निवास, उद्योग, साहित्य-संस्कृती, शिक्षण, कृषी, पर्यावरण व पर्यटन आदी क्षेत्रांतील सुविधा आणि संधींचे बँडिंग होणार असल्याचा विश्वास क्रेडाईच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केला आहे.

‘शेल्टर’मधून नाशिक चे ब्रॅँडिंग
नाशिक : क्रेडाईतर्फे होऊ घातलेल्या शेल्टर प्रदर्शनातून नाशकातील निवास, उद्योग, साहित्य-संस्कृती, शिक्षण, कृषी, पर्यावरण व पर्यटन आदी क्षेत्रांतील सुविधा आणि संधींचे बँडिंग होणार असल्याचा विश्वास क्रेडाईच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केला आहे. क्रेडाईतर्फे दि. २१ ते २५ डिसेंबर दरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर शेल्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, यात तीनशेहून अधिक उद्योग व्यावसायिक सहभागी होणार आहेत. यासंबंधी आयोजित एडिटर्स मिटमध्ये माहिती देताना क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल व प्रदर्शनाचे समन्वयक उदय घुगे यांनी सदर एक्स्पो हा केवळ बांधकाम व्यावसायिकांसाठी नसून याद्वारे एकूणच नाशिक शहरातील विविध क्षेत्रांतील सेवा- सुविधांचे ब्रँडिंग करण्याचा मानस व्यक्त केला. नोकरी, उद्योग, शिक्षणासाठी नाशिकमध्ये स्थलांतरित होणाºयांचे प्रमाण मोठे आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांनी नाशिक परिपूर्ण असून, हीच बाब या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाच्या सुवर्ण त्रिकोणात असलेला नाशिकचा समावेश, समृद्धी महामार्ग तसेच लवकरच सुरू होऊ घातलेली विमानसेवा यामुळे नाशकात उद्योग भरभराटीच्या तसेच रोजगाराच्या संधी वाढणार असून, त्याचा परिणाम रहिवासी क्षेत्र विस्तारण्यावरही होणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. शेल्टरचे सचिव उमेश वानखेडे, हेमंत पारख, अविनाश आव्हाड, सचिन बागड, प्रशांत पाटील, दीपक हांडगे, माधव बोधले, रोहन कुटे, अतुल अक्कडकर, ऋषीकेश कोते आदींसह क्रेडाईचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
बांधकाम व्यवसायाला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा
राज्यातील मेट्रो शहरांच्या तुलनेत नाशिकमधील हवामान रहिवासासाठी उत्तम असून तुलनेने घरांच्या किमतीही परवडणाºया आहेत. नाशकातील मूलभूत सुविधाही पुरेशा प्रमाणात असून, शहराचे ब्रँडिंग योग्य पद्धतीने झाले तर बांधकाम व्यवसायालाही प्रोत्साहन मिळून सदनिकांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. बांधकाम व्यवसायावर अवलंबून असणाºया अनेक घटकांनाही याचा लाभ होणार आहे.