राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंचा दबदबा
By Admin | Updated: June 16, 2017 18:33 IST2017-06-16T18:33:28+5:302017-06-16T18:33:28+5:30
नाशिकच्या वॉटर्स एज् बोट क्लबच्या १० खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदके मिळवली आहे.

राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंचा दबदबा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भारतीय नौकानयन संघटनेच्या मान्यतेने पश्चिम बंगाल नौकानयन संघटनेतर्फे कोलकाता येथे २० व्या सब ज्युनिअर आणि खुल्या राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या वॉटर्स एज् बोट क्लबच्या १० खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदके मिळवली आहे.
महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना वॉटर्स एज बोट क्लबच्या महिला खेळाडूंनी सिंगल स्कल प्रकारात सुवर्णपदक, कॉकलेस पेअर गटात कांस्य पदक तर सब ज्युनिअर मुलींच्या कॉकलेस फोर प्रकारात कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या कॉकलेस पेअर आणि डबल स्कल प्रकारात कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेत नाशिकच्या वॉटर्स एज् क्लबच्या सहभागी २४ खेळाडूंपैकी १० खेळाडूंनी यश मिळवत सगळ्यांचे लक्ष वेधले.
मुलींच्या गटात (सिंगल स्कल) पूजा सानप सुवर्णपदक, (चॅलेंजर फोर) पूजा जाधव, ऐश्वर्या शिंदे, धनश्री गोवर्धने, पूजा तांबे कांस्यपदक, (सन ज्युनिअर फोर) वैष्णवी गलांडे, गायत्री गलांडे, निधी भोसले, वैष्णवी गाडेकर, सिद्धी खैरे यांनी कांस्यपदक पटकावले. स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक अंबादास तांबे, संतोष कडाळे आणि संघ व्यवस्थापक म्हणून स्मिता तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील खेळाडू नाशिकला परतल्यावर बोटक्लबचे संस्थापक आणि माजी नगरसेवक विक्रांत मते यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.