सिन्नर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकाचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 16:45 IST2017-08-19T16:44:49+5:302017-08-19T16:45:17+5:30

सिन्नर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकाचा अपघातात मृत्यू
नाशिक : जेलरोड- टाकळीरोडवरील शेलार फार्म रस्त्यावर मधुबन लॉन्ससमोर शनिवारी (दि़१९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात सिन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रमेश साळी यांचा जागीच मृत्यू झाला़ दरम्यान, अज्ञात वाहनाचा त्वरीत शोध घ्यावा, तसेच पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी यावे या मागणीसाठी साळी यांच्या नातेवाईकांनी प्रारंभी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता़
मधुबन लॉन्ससमोर साळी यांची अॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, ईझेड ०५०४) ही रस्त्याच्या कडेला पडलेली होती़ या अपघातस्थळी त्यांच्या नातेवाईकांचा मोठा आक्रोश सुरू होता़ तर नागरिकांची तोबा गर्दी झाली होती़ साळी यांनी यापुवीृ नाशिक शहर पोलीस ठाणे तसेच कळवण येथे सेवा केलेली असून गत दीड वर्षांपासून ते सिन्नर पोलीस ठाण्यात कार्यरत होते़
पोलीस उपनिरीक्षक साळी हे गत महिनाभरापासून वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती असून अपघाताचे वृत्त समजताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी नातेवाईकांची समजूत घालून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला़ दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याबाबत पोलीस तपास करीत असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़