नाशिकचे विद्रोही साहित्य संमेलन चळवळीला दिशा देणारे ठरेल; किशोर ढमाले यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST2021-02-13T04:15:17+5:302021-02-13T04:15:17+5:30
उद्घाटक म्हणून ग्रेटाशी संपर्क सुरू संमेलनाध्यक्ष अद्याप निश्चित नाही नाशिक : नाशिक हे ऐतिहासिक शहर आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील लढ्याची ...

नाशिकचे विद्रोही साहित्य संमेलन चळवळीला दिशा देणारे ठरेल; किशोर ढमाले यांचे मत
उद्घाटक म्हणून ग्रेटाशी संपर्क सुरू
संमेलनाध्यक्ष अद्याप निश्चित नाही
नाशिक : नाशिक हे ऐतिहासिक शहर आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील लढ्याची तसेच आदिवासींच्या उठावाची आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची नाशिकला पार्श्वभूमी आहे. त्यामुळे यंदा याच भूमीत होणारे हे संमेलन विद्रोही चळवळीला ऐतिहासिक दिशा देणारे ठरेल, असे मत विद्रोही साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक किशोर ढमाले यांनी व्यक्त केले.
नाशिकमध्ये अखिल मराठी साहित्य संमेलन होत असून, त्याचवेळी विद्रोही साहित्य संमेलनही होणार आहे. त्याचीही तयारी सध्या सुरू आहे. त्या पार्श्वभमीवर या संमेलनाविषयी किशोर ढमाले यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न- नाशिकमध्ये पंधरावे विद्रोही साहित्य संमेलन होत आहे. सध्याचे वातावरण बघता या संमेलनाकडून काय अपेक्षा आहेत?
ढमाले- जेथे पारंपरिक साहित्य संमेलन असते तेथे विद्रोही साहित्य संमेलन भरवले जाते. नाशिकमध्ये समोरासमोर म्हणजे एकाचवेळी भरविण्यात येणारे हे तिसरे संमेलन आहे. सध्या देशात विद्वेषाचे वातावरण आहे. जातीय, धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. देशातील शेतकरी अस्वस्थ आहे. देशाच्या घटनेतील लोकशाही मूल्य व्यवस्थेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे विद्रोही सांस्कृतिक चळवळीसमोरदेखील आव्हान आहे. अशावेळी समतेचा विचार पसरविणारे हे संमेलन होणार आहे. त्यामुळे या परिस्थितीत हे संमेलन अधिक महत्त्वाचे आहे.
प्रश्न- संमेलनाच्या उद्घाटनासाठी पर्यावरणवादी युवा नेत्या ग्रेटा थनबर्ग यांना निमंत्रित करण्यात येणार होते..
ढमाले- होय, व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह करणाऱ्या मान्यवरांना विद्रोही साहित्य संमेलनास नेहमीच निमंत्रित केले जाते. या पूर्वी तिसऱ्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी अशाच प्रकारे अनेक देशांनी बंदी घातलेल्या डॉ. एजाज अहमद यांना निमंत्रित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांना निमंत्रित करताना यापूर्वीच आफ्रिकन लेखिका एंगेला डेव्हीस यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. यंदा ग्रेटा थनबर्ग यांना निमंत्रित करण्यात येणार असून, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संमेलनास अजून सव्वा ते दीड महिना बाकी असून या कालवधीत निश्चितच त्यांच्याशी संपर्क साधला जाईल.
प्रश्न- साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. यशवंत मनोहर यांच्यासह काही नावे चर्चेत आहेत?
ढमाले- साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पदाधिकारी रविवारी (दि.१४) नाशिकच्या स्थानिक आयोजकांसमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर दोन-तीन टप्प्यात एकदा कार्यक्रमाची पूर्वतयारी झाली की अध्यक्षही ठरतील.
मुलाखत- संजय पाठक