प्रो-कबड्डीमध्ये चमकणार नाशिकचा आकाश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST2021-09-24T04:17:18+5:302021-09-24T04:17:18+5:30

नाशिक : प्रो-कबड्डीच्या आठव्या हंगामासाठी आडगावचा राष्ट्रीय कबड्डीपटू आकाश संतोष शिंदे याची न्यू यंग प्लेअर म्हणून ‘पुणेरी ...

Nashik's sky will shine in pro-kabaddi! | प्रो-कबड्डीमध्ये चमकणार नाशिकचा आकाश !

प्रो-कबड्डीमध्ये चमकणार नाशिकचा आकाश !

नाशिक : प्रो-कबड्डीच्या आठव्या हंगामासाठी आडगावचा राष्ट्रीय कबड्डीपटू आकाश संतोष शिंदे याची न्यू यंग प्लेअर म्हणून ‘पुणेरी पलटन’ या संघात निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर गाजणाऱ्या या स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूची प्रथमच निवड झाली आहे. या निवडीची माहिती कळताच आडगावधील ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब तसेच सर्व कबड्डीप्रेमी ग्रामस्थांनी गुलाल उधळून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.

कबड्डी खेळाची मोठी परंपरा असलेल्या आडगावात अनेक खेळाडू घडले आहेत. आकाशला बालपणापासूनच कबड्डीची आवड होती. त्यामुळे शालेय स्तरापासूनच त्याने उत्कृष्ट चढाईपटू म्हणून कबड्डी स्पर्धा गाजवायला प्रारंभ केला होता. कबड्डी स्पर्धेतील आकाशच्या खेळातील कौशल्य पाहून ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आणि आडगावचे कबड्डीपटू सागर माळोदे, प्रशिक्षक प्रा. संतोष जाधव आणि प्रा. विनोद लभडे यांनी आकाशच्या कौशल्यावर मेहनत घेऊन त्याला पैलू पाडले. ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून विविध स्पर्धांमध्ये खेळल्याने त्याचा खेळ अधिकच बहरत गेला. जिल्हा कबड्डी असोसिएशनच्यावतीने खेळविल्या जाणाऱ्या किशोर गट निवड चाचणी स्पर्धेत त्याने जिल्ह्याला अजिंक्यपद पटकावून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळेच आकाशची महाराष्ट्र राज्य किशोर गट निवड चाचणी स्पर्धेत निवड झाली. आकाश सध्या कला शाखेच्या दुसऱ्या वर्गाला शिकत असून, इतक्या कमी वयात त्याने थेट प्रो-कबड्डीपर्यंत मारलेली मजल ही नाशिककरांच्या दृष्टीने निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

इन्फो

अधिकृत पहिलाच नाशिककर

यापूर्वी मूळ नाशिकचा असलेला मात्र नंदुरबारकडून खेळणारा बचावपटू आदिनाथ गवळी याची प्रो-कबड्डीमध्ये निवड झाली होती. मात्र, तो एअर इंडियाकडूनही खेळत असल्याने तसेच नंदुरबारकडूनच संघात प्रवेश मिळाल्याने नाशिककर म्हणून तो ओळखला जात नव्हता. परंतु, आकाश हा कायमस्वरुपी नाशिकमधूनच खेळला असल्याने प्रो-कबड्डीमध्ये निवड झालेला तो पहिलाच नाशिककर ठरला आहे.

इन्फो

आकाशची वाटचाल

२०१३-१४ या वर्षी १४ वर्षांआतील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा

२०१५ ते १७ या वर्षी राज्य किशोर गट निवड चाचणी स्पर्धा

२०१८ ते १९ या वर्षी राज्य कुमार गट निवड चाचणी स्पर्धा

२०१९ - या वर्षी १९ वर्षांआतील शालेय राज्य कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक

२०१९ - राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व

२०१९-२० दक्षिण विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत पुणे संघात निवड

२०१९-२० हरियाणातील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू

२०१९-२० ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड

२०२० - वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य सराव शिबिरासाठी निवड

फोटो

२३ आकाश शिंदे

Web Title: Nashik's sky will shine in pro-kabaddi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.