नाशिकच्या पोरी ढोल-ताशात हुश्शार
By Admin | Updated: October 3, 2015 23:20 IST2015-10-03T23:17:42+5:302015-10-03T23:20:08+5:30
नाशिक ढोल : कॉलेज तरुणींसह डॉक्टर्स महिलांचाही वाढतोय सहभाग

नाशिकच्या पोरी ढोल-ताशात हुश्शार
नाशिक : ‘नाशिक ढोल’ म्हणून महाराष्ट्रभर ढोल आणि ताशाची ओळख ज्या नाशिकने करून दिली त्या नाशिकमध्ये आता मुलींच्या ढोलपथकांचाही आवाज निनादू लागला आहे. सांस्कृतिक शहर पुण्यात महिला ढोलपथकांची आॅनलाइन भरती केली जाते, तर मुंबईत गोविंदा पथकांप्रमाणेच मुलींचेही व्यावसायिक ढोलपथक कार्यरत आहेत. नाशिकमधील महिला, मुली मात्र केवळ या वाद्याचा थरार अनुभवण्यासाठी स्वयंस्फूर्तीने ढोलपथकामध्ये सामील होत आहेत. केवळ हौस म्हणून या वाद्याकडे वळणाऱ्या मुलींना कुटुंबांकडूनदेखील प्रोत्साहन मिळत असल्याने गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये ढोल वाजविणाऱ्या महिला-मुलींची संख्या हजार ते दीड हजारांपर्यंत पोहचली आहे.
नाशिकमध्ये सध्या कार्यरत असलेल्या जवळपास सहा ढोलपथकांमध्ये मुलींच्या
ढोल-ताशाचा डंका वाजत आहे. याची सुरूवात गुलालवाडी व्यायामशाळेने केल्याचे सांगितले जाते. गुलालवाडीने लेजीमबरोबरच ढोलपथक तयार केले आणि काही वर्षांनी याच व्यायामशाळेत शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींनी यात सहभाग नोंदविण्यास सुरूवात केली. रमा पेडणेकर या पहिल्या ढोल वादक महिला असल्याचा दावा गुलालवाडी व्यायामशाळेचे व्यवस्थापक बाळासाहेब देशपांडे यांनी केला आहे. नाशिकमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून महाविद्यालयीन मुली, गृहिणी, नोकरदार महिला एव्हढेच नव्हे तर डॉक्टर्स असलेल्या काही महिलादेखील ढोल पथकात आहेत.
वाद्याची अनेक साधने उपलब्ध असतानाही पारंपरिक ढोल वाजविण्याकडे महाविद्यालयीन तरुणी आकर्षित होत आहेत हे विशेष. नाशिकमधील ढोलपथकात असलेल्या महिलांपैकी सुमारे ८० टक्के विद्यार्थिनी आहेत. ढोल वाजविण्यात असलेली मौज, ढोलचा निनाद आणि जयंती, मिरवणुकांमध्ये ढोल वाजविताना मिळणारे प्रोत्साहन यामुळे ढोल वाजविण्याकडे मुलींचा कल वाढला आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषेत ढोल वाजविण्याच्या प्रथेमुळेदेखील मुली याकडे आकर्षित झाल्या आहेत. विशेष म्हणजे पालकांकडून मुलींना प्रोत्साहन मिळू लागले आहे. गणेशोत्सवासाठी खास पालक आपल्या पाल्यांना ढोल वाजविण्याच्या शिबिरात पाठवित असून, या काळात मुलींची संख्या सर्वाधिक असते.
नाशिकमध्ये केवळ गणेशोत्सवातच ढोल वाजविण्यास मिळावा यासाठी मुली आणि त्यांचे पालक आग्रही असतात. त्यासाठी दोन महिने अगोदरच ढोलपथकांकडे नोंदणी केली जाते. ढोल वाजविण्यासासाठी मुली पुढे येत असल्याने आणि पालकही त्यासाठी प्रोत्साहन देत असल्याने नाशिकच्या मुलींच्या ढोलचा निनाद महाराष्ट्रभर घुमणार आहे. मुलींचा हा ओघ वाढतच असून, खास ताशा आणि ढोल वाजविण्यात तरबेज झालेल्या या मुलींना डोक्यावर फेटा बांधून ढोल वाजवितच थ्रील वाटते.