नाशिकरोड, उपनगर परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:46 IST2017-08-22T23:45:06+5:302017-08-22T23:46:58+5:30

नाशिकरोड, उपनगर परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापे
नाशिक : शहरातील नाशिकरोड, उपनगर व पंचवटी परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापामारी करून पोलिसांनी २५ जुगाºयांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, असा लाखाचा ऐवजही जप्त केला आहे़ यामुळे शहरात अवैध धंदे अर्थात जुगार, मटक्याचे अड्डे सुरू असल्याचे समोर आले असून, या कारवाईमध्ये आणखी वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़
नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील पवारवाडीतील सुभाषरोडवर सोमवारी (दि़२१) दुपारी पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी संशयित प्रकाश रणधीर व त्याचे सहा साथीदार मटका जुगार खेळत होते़ पोलिसांनी त्यांच्याकडून ६३ हजारांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपनगर परिसरातील गांधीनगर येथील एका जुन्या इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला़ याठिकाणी संशयित सुनील चौधरी व त्याचे चार साथीदार पत्त्यांवर जुगार खेळत होते़ त्यांच्याकडून सहा हजार ४०० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, उपनगर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.