पाणीपुरी विक्रेत्याकडून खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 23:35 IST2017-08-18T23:32:17+5:302017-08-18T23:35:57+5:30

पाणीपुरी विक्रेत्याकडून खंडणीची मागणी
नाशिक : पाणीपुरीचा धंदा करू देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करून पाणीपुरी विक्रेत्याचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी (दि. १७) रात्री गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाजवळ घडली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी सराईत गुन्हेगार दत्तू धुमाळ विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे़
सरकारवाडा पोलीस ठाण्यात संदीप पारधसिंग बघेल (२६,रा. केटीएचएम महाविद्यालयामागे, जोशी वाडा, गंगापूररोड, मूळ रा. मंगरोल ता. श्योंधा, जि. दातिया मध्य प्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तो प्रमोद महाजन उद्यानाजवळ पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो़ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास संशयित दत्तू उत्तम धुमाळ (३४, रा. केटीएचएम महाविद्यालयामागे, जोशीवाडा, गंगापूर रोड. ह.मु. हिंगमिरे चाळीसमोर, आनंदवली) हा बघेलकडे गेला व धंदा करायचा असेल तर पाच हजार रुपये खंडणी मागितली़ त्यास बघेल याने विरोध केला असता धुमाळ याने खिशातील मोबाइल हिसकावून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह सरकारवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले़ त्यांनी त्वरित नाकाबंदी करून संशयित धुमाळ यास अटक केली़