काठेगल्लीतील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 17:07 IST2017-11-01T17:06:14+5:302017-11-01T17:07:44+5:30

काठेगल्लीतील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास
नाशिक : शहरात घरफोड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून भरदिवसा घरफोडी करण्यापर्यंत या चोरट्यांची मजल गेली आहे़ भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील काठे गल्लीत भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ५० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़३१) सकाळच्या सुमारास घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मीकांत रमेश रकटे (रा.रघुविहार सोसा.निर्मला कॉलनी) हे हे कुटुंबासह मंगळवारी सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते़ साडेअकरा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ त्यामध्ये प्रत्येकी ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन हार, प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाचे कानातील तीन जोड, साठ सोन्याचे मणी यांचा समावेश आहे़
या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़