नाशिककरांचे आरोग्य, सुरक्षा रामभरोसे...!
By Admin | Updated: November 1, 2015 21:22 IST2015-11-01T21:22:21+5:302015-11-01T21:22:52+5:30
बेवारस : कुंभमेळ्यामध्ये जागोजागी ठेवलेले कचर्याचे ‘ड्रम’ अद्यापही ‘जैसे थे’

नाशिककरांचे आरोग्य, सुरक्षा रामभरोसे...!
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याची अखेरची पर्वणी होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे; मात्र अद्याप शहरातील सातपूरपासून तर थेट नाशिकरोडपर्यंत ठिकठिकाणी ठेवलेले लोखंडी ड्रम (कचरापेट्या) ‘जैसे थे’ आहेत. यामुळे शहराचे सार्वजनिक आरोग्य अन् सुरक्षा दोघांनाही धोका निर्माण झाला आहे. कारण हे ड्रम कचऱ्याने ओसंडून वाहत असून, ते स्वच्छ करण्याची गरजदेखील मनपाच्या आरोग्य विभागाला वाटत नाही. शहरातील बसस्थानक, पेट्रोलपंप, मंदिरे, शाळा, महाविद्यालये, उद्याने, मॉल, रुग्णालये, सिग्नल, वर्दळीचे रस्ते आदि ठिकाणी ठेवलेल्या लोखंडी ड्रमचा गैरफायदा समाजकंटक अथवा विकृत मानसिकतेच्या लोकांनी घेतल्यास शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊन अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठिकठिकाणी ठेवलेले कचऱ्याचे ड्रम शहरात अनुचित दुर्घटनेला पूरक ठरू शकतात, असे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे. या अगोदरही देशातील काही शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यासाठी थेट कचराकुंड्यांचा आधार घेतला गेल्याचे उघडही झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलीस प्रशासनाने तत्काळ शहरातून ड्रमचा भंगार उचलावा, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.
नाशिक हे ऐतिहासिक-धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर आहे; मात्र औद्योगिक आणि संरक्षण खात्याला योगदान देणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या संस्थाही शहरात कार्यरत आहेत. यामुळे शहराची सुरक्षाव्यवस्था महत्त्वाची आहे, यामध्ये कोणतेही दुमत नाही. यापूर्वीदेखील विविध अतिरेकी संघटनांशी संबंध ठेवणाऱ्या दहशतवाद्यांना शहरातून अटक करण्यात आली होती. त्यामुळे नाशिक हे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या शहरांपैकी एक आहे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही. त्यामुळे शहराची सुरक्षाव्यवस्था अधिकाधिक चोख कशी राहील, या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. शहरातील त्र्यंबक रस्त्यावरील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संरक्षण भिंतीजवळ तसेच मुख्य चौकांमध्ये पेट्रोलपंप, बसस्थानक, रुग्णालय, रामकुंड परिसर, तपोवन, औरंगाबाद महामार्ग, पुणे महामार्ग अशा सर्वच ठिकाणी जागोजागी लोखंडी ड्रम नजरेस पडतात. सध्या या ड्रमचा वापर कचरा टाकण्यासाठी होत असून यामध्ये साचलेला कचरा बाहेर वाहत आहे. तसेच कचरा म्हणून या ड्रममध्ये गैरकृत्य घडविण्याच्या इराद्याने स्फोटक वस्तूही टाकण्याचा धोका बळावला आहे. ठिकठिकाणी मांडलेले ड्रम ताबडतोब हटविले जावेत, अशी मागणी आहे.