नाशिककरांचं ‘दान पावलं’!
By Admin | Updated: September 28, 2015 23:29 IST2015-09-28T23:25:55+5:302015-09-28T23:29:33+5:30
पर्यावरणपूरक विसर्जन : पावणे तीन लाख गणेशमूर्तींचे दान

नाशिककरांचं ‘दान पावलं’!
नाशिक : दात्याने मनापासून झोळीत दान टाकलं, की ‘दान पावलं...दान पावलं’ असे रामप्रहरी वासुदेवाच्या मुखातून ऐकण्याची लोकसंस्कृती अजूनही काही प्रमाणात जपलेल्या नाशिककरांनी निसर्गाचे दान निसर्गालाच बहाल करण्याची साद ऐकली आणि अनंत चतुर्दशीला स्वच्छ गोदावरीचा वसा घेत गणेशमूर्ती दानाची संकल्पना राबवित पर्यावरणपूरक विसर्जनाला हातभार लावला. नाशिक महापालिकेसह विविध सेवाभावी संस्था-संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार २ लाख ७१ हजार ३८६ गणेशमूर्ती दान स्वरूपात संकलित झाल्याचा दावा मनपाच्या वतीने करण्यात आला आहे. याशिवाय, निर्माल्य कलशाच्या माध्यमातून सुमारे ७२ टन निर्माल्यही जमा करण्यात आले.
मंतरलेल्या दशदिनाची यथासांग सांगता अनंत चतुर्दशीला झाली आणि वाजत-गाजत नाशिककरांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. यंदाचा सिंहस्थ ‘हरित कुंभ’ संकल्पना घेऊन साजरा करण्याचा प्रयत्न झाला. गोदावरीच्या प्रदूषणाबाबत न्यायालयाने वारंवार प्रशासनाचे कान उपटल्याने प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झाली आणि त्यातूनच विविध सेवाभावी संस्था-संघटनांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार, घरोघरी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती प्रतिष्ठापित करण्याऐवजी शाडू मातीच्या मूर्ती बसविण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर, अनंत चतुर्दशीला नाशिक महापालिकेने गणेशमूर्ती गोदावरी अथवा नद्यांमध्ये विसर्जित न करता त्यांचे दान करण्याची संकल्पना लोकांसमोर मांडली. त्याला विविध सेवाभावी संस्था व संघटनांचीही साथ लाभली आणि एक मिशनच राबविले गेले.
नाशिक महापालिकेने शहरात ५९ विसर्जन स्थळे निश्चित केली होती. त्यात ३० ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली होती. याशिवाय निर्माल्य कलश व मूर्ती संकलनासाठी वाहनांचीही सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार, दिवसभरात शहरात २ लाख ७१ हजार ३८६ गणेशमूर्ती दान स्वरूपात संकलित झाल्याचा दावा नाशिक महापालिकेने केला आहे. सर्वाधिक गणेशमूर्तींचे दान पंचवटी परिसरात झाले. याठिकाणी १ लाख ४५ हजार गणेशमूर्ती संकलित झाल्या.
गोदाघाट परिसरात तसेच सोमेश्वर, इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयाजवळील घाटावर काही संस्था-संघटनांकडून नागरिकांना गणेशमूर्ती दान करण्यासंबंधी प्रबोधन करत होते. याशिवाय, बहुसंख्य नाशिककरांनी आपल्या श्रद्धेला धक्का न लावता नदीपात्रात गणेशमूर्ती पाण्यात बुडवत नंतर स्वयंस्फूर्तीने मूर्ती दान स्वरूपात जमा केली. त्यामुळे, गोदाघाटावर ठिकठिकाणी दान स्वरूपात केलेल्या गणेशमूर्ती दिसून आल्या.
नाशिककरांनी गोदावरीच्या प्रदूषणालाही आळा घालण्यासाठी दहा दिवसांत जमा झालेले निर्माल्यही कलशात टाकत पर्यावरणपूरक विसर्जनाला साथ दिली. त्यामुळे, नदीपात्र परिसरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशांद्वारे सुमारे ७२ टन निर्माल्य जमा झाले. (प्रतिनिधी)