नाशिककरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस
By Admin | Updated: May 21, 2017 00:41 IST2017-05-21T00:40:34+5:302017-05-21T00:41:09+5:30
’हा खेळ सावल्यांचा : भौगोलिक घटनेचा लुटला आनंद; सूर्य डोक्यावर सावली पायाखाली

नाशिककरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : उन्हाळ्याच्या रणरणत्या उन्हात शनिवारी (दि. २०) दुपारी नाशिककरांनी ‘शून्य सावली’ (झिरो शॅडो डे)चा अनुभव घेतला. निसर्ग तसेच भौगोलिक घडामोडींमुळे होणाऱ्या या घटनेत नाशिककरांनी सूर्य डोक्यावर आल्यानंतर आपली सावली अगदी पायाशी येऊन अदृश्य झाल्याचे अनुभवले.
शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सूर्य डोक्यावर आल्यानंतर नाशिककरांनी आपली सावली पायाखाली येताच रस्त्यात थांबून आपल्या पायाखालील सावलीचे निरीक्षण केले. रस्त्यांप्रमाणेच मैदाने, क्रीडांगणे, घरांच्या छतावर नागरिकांनी शून्य सावलीचा अनुभव घेतला. डोक्यावर तळपता सूर्य असतानाही आपली सावली गायब झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व आनंदाचे वातावरण बघायला मिळाले.
पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून तो साडेतेवीस अंशांनी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवरील ॠ तू बदलतात आणि सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण सुरू होते. दररोज सूर्याेदयाची किंवा सूर्यास्ताची क्षितिजावरची जागा बदलते आणि वर्षातून दोनदा सूर्य डोक्यावर येण्याच्या घटना घडतात आणि यामुळे प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाजवळ असते आणि ती काही वेळाने नाहीशी होते. सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायनामुळे घडणारा हा अनुभव घेण्याची संधी राज्यातील नागरिकांना शुक्रवार (दि. २६)पर्यंत अशा वेगवेगळ्या दिवशी अनुभवता येणार आहे.