नाशिककरांनी अनुभवली मराठी भाषेची गंमतजंमत
By Admin | Updated: October 2, 2015 23:57 IST2015-10-02T23:56:34+5:302015-10-02T23:57:21+5:30
लेखक तुमच्या भेटीला : फडके यांचे व्याख्यान

नाशिककरांनी अनुभवली मराठी भाषेची गंमतजंमत
नाशिक : मराठी भाषेत एका काना-मात्रावरून शब्दाचा अर्थ कसा बदलतो, याची गंमत नाशिककरांनी ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात अनुभवली. मराठी विश्वकोश मंडळाचे सदस्य आणि भाषा अभ्यासक अरुण फडके यांनी आपल्या व्याख्यानात मराठी भाषेतील सौंदर्यस्थळांचा धांडोळा घेत उपस्थितांना खिळवून ठेवले.
ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाचा शुभारंभ शंकराचार्य संकुलात झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके, बॅँक आॅफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर प्रताप मोहंती, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे उपस्थित होते. यावेळी पहिले पुष्प ठाणे येथील अरुण फडके यांनी ‘भाषागंमत’ या विषयावर गुंफले. फडके यांनी मराठी भाषेतील अनेक शब्दांचे किस्से कथन केले. अट्टहास आणि अट्टाहास हे दोन्ही शब्द वेगळे आहेत. एका कान्याच्या फरकावरून शब्दाचा अर्थ बदलतो. अट्टहास म्हणजे खूप मोठ्याने हसणे आणि अट्टाहास म्हणजे पराकाष्ठेचे प्रयत्न होय. असाच फरक अश्विन आणि आश्विन या दोन शब्दांमध्ये आहे. अश्विन म्हणजे घोडेस्वार तर आश्विन हा मराठी महिना आहे. मराठीत ‘बायको’ हा ओकारान्त स्त्रीलिंगी शब्द एकच आहे. सामान्य रुपातही हा शब्द बदलत नाही. भाषेची गंमत अनुभवताना त्याचा अभ्यासही केला पाहिजे. इंग्रजी भाषेतील सर्व वैशिष्ट्ये मराठीतही आहेत. परंतु त्यांची तशी मांडणी मराठीत झालेली नाही. त्यामुळे मराठी भाषेचीही वैशिष्ट्ये सांगणारा कोश निर्माण होण्याची गरज असल्याचेही फडके यांनी सांगितले.