नाशिककरांनी न्याहाळला ‘सनबो’
By Admin | Updated: June 7, 2017 22:13 IST2017-06-07T22:13:00+5:302017-06-07T22:13:00+5:30
नाशिककरांनी बुधवारी दुपारी बराच वेळ ‘सनबो’ न्याहाळला. सुर्याभोवती वर्तुळाकार सप्तरंगी इंद्रधनुष्य बघावयास मिळाला.

नाशिककरांनी न्याहाळला ‘सनबो’
अझहर शेख / आॅनलाइन लोकमत, नाशिक : आकाशात दिसणारा रेनबो अर्थात इंद्रधनूष्य हा सर्वांनाच परिचित आहे; मात्र आकाशात हलक्या पावसाच्या फवाऱ्यातून सूर्य किंवा चंद्र यांची प्रकाशकिरणे जाऊन त्यांचे विघटन होते आणि सप्तरंगी वर्तुळाकार खळं सुर्य व चंद्र या ग्रहांभोवती तयार होतो. यास शास्त्रीय भाषेत ‘सनबो’ व ‘मुनबो’ असे म्हटले जाते. नाशिककरांनी बुधवारी दुपारी बराच वेळ ‘सनबो’ न्याहाळला. सुर्याभोवती वर्तुळाकार सप्तरंगी इंद्रधनुष्य बघावयास मिळाला. बुधवारी दुपारच्या सुमारास आकाशात ढग दाटलेले असताना त्यामधून डोकावणाऱ्या सुर्यनारायणाभोवती सप्तरंगी कमानीचे वर्तूळ दिसू लागले. या आगळ्या इंद्रधनूष्याला बघण्यासाठी नाशिककरांनी घरांच्या छतांवर धाव घेतली. काहींनी निसर्गाचा हा क्षण आपल्या भ्रमणध्वनीच्या कॅमेऱ्याद्वारे टिपून तो सोशल मिडियावर पोस्टही केला. ढग दाटून आल्यानंतर हलका पाण्याचा फवारा जेव्हा हवेने उडू लागतो त्यावेळी प्रकाशकिरणे त्यामधून परावर्तीत होऊन त्याचे विघटन होऊन सप्तरंगी इंद्रधनुष्याचं खळं (सनबो) सूर्याभोवती तयार झालेले होते. निसर्गाच्या या विस्मयकारी किमयेचे अनेकांना कुतूहल वाटले. याबरोबचर हे सप्तरंगी वर्तुळ कसे आणि का तयार झाले या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सूकताही अनेकांना लागली होती.