नाशिक : येवला तालुक्यातील आडगाव रेपाळसारख्या ग्रामीण भागातील युवक कृष्णा तनपुरे याने स्क्वॉट्स या व्यायाम प्रकारात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधील दोन विक्रम गुरुवारी (दि. ८) मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला. त्यातील एक विक्रम इजिप्तमधील व्यक्तीच्या नावावर, तर दुसरा विक्रम इंग्लंडच्या व्यक्तीच्या नावावर होता.
कृष्णा हा मुळात ट्रायथलॉन प्रकारातील खेळाडू आहे. बालपणी दंडापासून हात विचित्र पद्धतीने फ्रॅक्चर झाल्याने त्याचा डावा हात दुमडून अद्यापही खांद्यापर्यंत जाऊ शकत नाही. एक प्रकारे तो हाताने २५ टक्के अपंग श्रेणीत गणला जातो. त्याला शासकीय रुग्णालयातून तसे प्रमाणपत्रदेखील प्राप्त झालेले आहे. तो सध्या
कोरोनापश्चात होणाऱ्या ट्रायथलॉन स्पर्धेची तयारी करीत असून त्यात ओपन नॅशनल स्पर्धेत त्याला रौप्यपदकही यापूर्वीच मिळाले आहे. ट्रायथलॉन स्पर्धेसाठी धावणे, जलतरण, सायकलिंग अशा तिन्ही प्रकारांत सर्वोत्तम कामगिरी नोंदवावी लागते. त्यासाठी प्रत्येक प्रकारात दमदार स्टॅमिना असणे तसेच पाय मजबूत असणे आवश्यक असते. त्यामुळेच कृष्णा तनपुरे याने पायाला मजबुती देणाऱ्या स्क्वॉट्स या व्यायाम प्रकाराची निवड केली. त्यानंतर या प्रकारात गती मिळवण्यासह विशेष नैपुण्य प्राप्त केल्यानंतर कृष्णाने या प्रकारातील विक्रम मोडीत काढण्याचा निर्धार केला. गुरुवारी सकाळी त्याने सर्व रेकॉर्डचे अधिकृत चित्रण करीत १५ मिनिटांत १२७८ स्क्वॉट्स मारत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधील यापूर्वीचे दोन विक्रम मोडीत काढले. तपोवनात गोदेकाठी या उपक्रमाप्रसंगी फिट इंडिया मूव्हमेंटबाबत जनजागृती तसेच ऑलिम्पिकपटूंना शुभेच्छादेखील दिल्या. या सर्व प्रयत्नात त्याला साक्षी बनकर, सृष्टी गवळी, जयेश गायकवाड, राहुल पवार, मेघना, अश्विनी काडे, तेजस, अनिकेत पाटील, नरेंद्र अभोणकर यांनी विशेष साहाय्य करीत विक्रम नोंदवण्यासाठी प्रोत्साहन दिले.
इन्फो
यापूर्वीचे दोन विक्रम मोडीत
यापूर्वी इजिप्तच्या नागरिकाने १ मिनिटात ७० स्क्वॉट्स मारण्याचा केलेला विक्रम कृष्णाने एका मिनिटाला ७५ करून तर इंग्लंडच्या नागरिकाचा ३ मिनिटात २०६ स्क्वॉट्स करण्याचा विक्रम मोडीत काढून २२६ स्क्वॉट्स मारले. तसेच कृष्णाने एकूण १५ मिनिटांत १२७८ स्क्वॉट्स मारत नवीन विक्रमाचीही नोंद केली आहे.
फोटो
०८कृष्णा