‘थाईफेक्स’मध्ये नाशिक वाइन

By Admin | Updated: April 1, 2017 01:07 IST2017-04-01T01:06:55+5:302017-04-01T01:07:07+5:30

नाशिक : विविध खाद्यपदार्थांची चव चाखता यावी आणि या खाद्यपदार्थांची जगाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशाने भरविण्यात येणाऱ्या ‘थाईफेक्स - २०१७’मध्ये नाशिकची वाइनदेखील झळकणार आहे.

Nashik wine in 'Thyifax' | ‘थाईफेक्स’मध्ये नाशिक वाइन

‘थाईफेक्स’मध्ये नाशिक वाइन

अझहर शेख : नाशिक
आशिया खंडातील जागतिक स्तरावरील विविध खाद्यपदार्थांची चव चाखता यावी आणि या खाद्यपदार्थांची जगाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशाने भरविण्यात येणाऱ्या ‘थाईफेक्स - २०१७’मध्ये नाशिकची वाइनदेखील झळकणार आहे.
जागतिक स्तरावरील व्यावसायिक प्रदर्शन म्हणून नावलौकिक असलेल्या थायलंड येथील ‘थाइफे क्स’ या प्रदर्शनाला ३१ मेपासून सुरुवात होत आहे. थायलंडची राजधानी असलेल्या बॅँकॉकच्या इम्पॅक्ट एक्झिबिशन अ‍ॅण्ड कन्वेंन्शन सेंटरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी आशिया खंडातील विविध देशांमधील राज्यातील महत्त्वाच्या शहरात उत्पादित होणाऱ्या जागतिक दर्जाच्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.  या प्रदर्शनामधील खाद्यपदार्थांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील नाशिकची वाइन, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, कोकणचे कोकम यांचा समावेश आहे. आशिया खंडातील जागतिक स्तरावरील विविध खाद्यपदार्थांचे हे प्रदर्शन असून, यामध्ये भारतामधील दहा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचे सादरीकरण केले जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील या तीन पदार्थांचा समावेश आहे.
नाशिकची द्राक्षे जगप्रसिद्ध असून, सर्वत्र नाशिकच्या द्राक्षाची चव लोकप्रिय आहे. नाशिकमध्ये आजही द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. येथील हवामान व मातीचा पोत द्राक्ष उत्पादनासाठी पोषक आहे. यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात द्राक्षाची शेती मोठ्याप्रमाणावर केली जाते. येथील द्राक्ष परदेशात निर्यातही केली जातात. द्राक्षांची गुणवत्ता उत्तम असल्यामुळे वाइनरी कंपन्यांनाही नाशिक खुणावत आहे. त्यामुळे नाशिकच्या गोवर्धन, गंगापूर, सावरगाव, दिंडोरी, विंचूर या परिसरात वाइन उद्योगाला चालना मिळत आहे. सुमारे बारा ते पंधरा वाइन कंपन्या नाशिक जिल्ह्यात सुरू आहे. वाइन टुरिझमलादेखील वाव मिळत असून, भारताच्या विविध राज्यांमधून तसेच दुसऱ्या देशांमधूनही वाइनप्रेमी नाशिकमध्ये वाइनचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात. येथील वाइनच्या उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता अन्य शहरांमध्ये तयार होणाऱ्या वाइनपेक्षा चांगला असल्याचे मत वाइनप्रेमींकडून व्यक्त केले जाते. नाशिकच्या वाइनला ‘जीआय टॅग’ मिळाल्यामुळे वाइनचा प्रवास आता सातासमुद्रापार वेगाने होणार आहे. कारण जीआय टॅग मिळाल्यामुळे नाशिक वाइन थेट आशिया खंडातील थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘थाईफेक्स’ प्रदर्शनात सादर केली जाणार आहे. नाशिक वाइनचा प्रवास जागतिक बाजारपेठेच्या दिशेने सुरू होणार आहे. याचा थेट फायदा द्राक्ष उत्पादकांना होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकच्या वाइनला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. द्राक्ष उत्पादनाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी त्यांना प्रयत्नशील राहावे लागणार आहे.
‘जीआय’बाबत महाराष्ट्र देशात अव्वल
भारत कृषिप्रधान देश असून, शेतीमध्ये महाराष्ट्रानेही प्रगती केली आहे. शेती उत्पादनांपैकी भारतातून तब्बल ८७ शेती उत्पादनांना ‘जीआय टॅग’ मिळाला आहे. यापैकी २२ उत्पादने ही एकट्या महाराष्ट्रातून असल्याची माहिती जीआय तज्ज्ञ प्रा. गणेश हिंगमिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शेती उत्पादनांच्या जीआय टॅगबाबत महाराष्ट्र अव्वलस्थानी असून, केंद्र सरकार ‘जीआय टॅग’ व त्याचे महत्त्वाविषयी जागरूक आहे. केंद्राकडून यासाठी मदत केली जाते; मात्र राज्य सरकारने याकडे अद्याप गांभीर्याने बघितले नसून लोकप्रतिनिधींनी याकडे डोळसपणे बघितल्यास अधिक गती मिळेल, असा विश्वास हिंगमिरे यांनी व्यक्त केला आहे.
...काय आहे ‘जीआय टॅग’
जागतिक व्यापार संघटनेचा कायदा असून, एखाद्या विशिष्ट भागात उत्पादित होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जीआय टॅग महत्त्वाचा ठरतो. भौगोलिक उपदर्शन अर्थात ‘जिओग्राफिकल इंडिकेशनमुळे खाद्यपदार्थांचे अस्तित्व कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तयार होते आणि त्या उत्पादनाला जागतिक स्तरावर चांगला बाजारभाव प्राप्त होतो. यामुळे त्या शहराचे ‘ब्रॅण्डिंग’ जगभर होण्यास मदत होते.

Web Title: Nashik wine in 'Thyifax'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.