राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याला अखेरीस मुहूर्त लागला
By Admin | Updated: November 19, 2014 01:47 IST2014-11-19T01:41:11+5:302014-11-19T01:47:45+5:30
राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याला अखेरीस मुहूर्त लागला

राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याला अखेरीस मुहूर्त लागला
नाशिक : वसंत गिते यांची नाराजी, त्याच धर्तीवर राज्यात अनेक ठिकाणी घडलेली राजीनाम्याची पुनरावृत्ती या पार्श्वभूमीवर लांबलेल्या राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याला अखेरीस मुहूर्त लागला आहे. पुढील शुक्रवारी म्हणजेच २८ तारखेपासून १ डिसेंबरपर्यंत असे चार दिवस ते नाशिकला तळ ठोकणार आहेत. या दौऱ्यातच अनेक संघटनात्मक फेरबदल होतील. त्याचबरोबर गिते यांना पर्याय शोधला जाण्याची शक्यता आहे.मनसेचा बालेकिल्ला झालेल्या नाशिक शहरात विधानसभा निवडणुकीत या पक्षाची धुळधाण झाली. त्यानंतर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार वसंत गिते यांनी पदाचा राजीनामा दिला. गिते यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचे जाहीर केले असले, तरी त्यांचे समर्थक असलेले जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्यासह दोनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यामुळे आधीच मनसेत अस्वस्थ असलेल्या आणि भाजपा सेनेच्या मार्गावर असलेल्या गिते यांनी हे शक्तिप्रदर्शनच केले होते. त्यावर राज ठाकरे यांनी सर्वांचेच राजीनामे घेऊन संबंधितांना किंमत देत नसल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी राज ठाकरे यांचा नाशिक दौरा नियोजित होता; परंतु तो रद्द करण्यात आला आणि आता येत्या २८ नोव्हेंबर रोजी ते नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान ते नाशिकमध्ये तळ ठोकून प्रभागनिहाय पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या कामांचा तसेच पालिकेतील कामाचा आढावा घेणार आहेत. वसंत गिते तसेच सचिन ठाकरे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर नूतन पदाधिकारी नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)