नाशिकचे तपमान राज्यात नीचांकी
By Admin | Updated: January 11, 2017 01:16 IST2017-01-11T01:16:09+5:302017-01-11T01:16:29+5:30
हुडहुडी : एका दिवसात चार अंशाने घट

नाशिकचे तपमान राज्यात नीचांकी
नाशिक : जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. या दहा दिवसांत तपमानात सातत्याने घट होत आहे. मंगळवारी (दि. १०) नाशिकचा पारा थेट ६.५ अंशापर्यंत घसरल्याने राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून हवामान खात्याने नाशिकची नोंद केली आहे. नवीन वर्षाच्या आगमनापासून नाशिककरांना थंडीचा कडाका अधिकाधिक प्रमाणात सहन करावा लागत आहे. या दहा दिवसांमध्ये नाशिकच्या किमान तपमानात सातत्याने घट होत असून, तीन दिवसांत किमान तपमानात कमालीची घट झाली आहे. मंगळवारी तपमान थेट ६.५ अंशांवर आल्याने शहरवासीय गारठले असून, थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. डिसेंबर महिन्यात सर्वांत नीचांकी ७.५ इतके तपमान नोंदविले गेले होते. शहराचा पारा थेट ६.५ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिकला गारठा प्रचंड वाढला आहे.