नाशिकरोडला सहा प्रभागांत ९२ मतदान केंद्रे सज्ज
By Admin | Updated: February 21, 2017 01:14 IST2017-02-21T01:14:16+5:302017-02-21T01:14:27+5:30
तयारी पूर्ण : १५00 अधिकरी आणि कर्मचारी नियुक्त; मतदानप्रक्रियेसाठी कडक पोलीस बंदोबस्तात तयारी पूर्ण

नाशिकरोडला सहा प्रभागांत ९२ मतदान केंद्रे सज्ज
नाशिकरोड : मनपा निवडणुकीत नाशिकरोड विभागातील सहा प्रभागांमध्ये ९२ मतदान केंद्रांवर मतदानप्रक्रिया राबविली जाणार असून, याकरिता १५०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रावर संबंधित अधिकारी, कर्मचारी, मतदान यंत्रे आदि साहित्य सोमवारी सायंकाळपर्यंत रवाना करण्यात येऊन कडक पोलीस बंदोबस्तात मतदानप्रक्रिया राबविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मनपा निवडणुकीची सुरू असलेली धामधूम पूर्ण झाली असून, शेवटच्या मतदानप्रक्रियेच्या तयारीसाठी प्रशासन व उमेदवार, कार्यकर्ते कामाला लागलेले होते. निवडणूक शाखेकडून मतदान केंद्र ताब्यात घेण्यात आले असून, त्या ठिकाणी मतदानप्रक्रिया राबविण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सामनगांवरोड शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात निवडणूक निर्णय अधिकारी डी. एच. हौसारे यांनी प्रभाग १७, १८ व १९ मधील मतदान केंद्र व खोल्यावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदानप्रक्रिया राबविण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्यात. यावेळी सर्व मतदान यंत्राची तपासणी करण्यात आली. दुपारनंतर एसटी महामंडळाच्या बसमधून प्रत्येक मतदान केंद्रावर संबंधित अधिकारी, कर्मचारी, मतदान यंत्रे व इतर साहित्य पोहचविण्यात आले. तसेच दुर्गा उद्यान येथील विभागीय मनपा कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्बळ यांनी मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदान प्रक्रिया राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक मतदान खोलीला १ खोली प्रमुख, ३ मतदान अधिकारी व एक शिपाई असे ५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्रासाठी एक केंद्रप्रमुख व दोन सहायक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. नाशिकरोडच्या सहा प्रभागात मतदानासाठी ९२ मतदान केंद्र व २६३ मतदान खोल्या असून, त्याकरिता १५०० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नाशिकरोड विभागात निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, सर्वांना मतदानाची उत्सुकता लागली आहे. (प्रतिनिधी)