नाशिकरोड कारागृहात अधिकाऱ्यास मारहाण
By Admin | Updated: December 26, 2016 02:53 IST2016-12-26T02:53:02+5:302016-12-26T02:53:15+5:30
असुरक्षितता कायम : आणखी दोन मोबाइल सापडले

नाशिकरोड कारागृहात अधिकाऱ्यास मारहाण
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बिघडलेली शिस्त व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच कैद्यांकडून मोबाइल सापडण्यापाठोपाठ तुरुंग अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या घटनाही घडून लागल्या आहेत़ मोक्कातील एका आरोपीने तुरुंग अधिकाऱ्यास मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़२४) दुपारच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, कारागृहातून आणखी दोन मोबाइल जप्त करण्यात आले कारागृह की ‘मोबाइल शॉपी’ असा प्रश्न निर्माण झाला आहे़
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग अधिकारी प्रदीपकुमार ज्ञानदेव बाबर हे शनिवारी दुपारी कारागृहात तपासणी करीत होते़ दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास मंडल कार्यालयासमोर मोक्का तसेच जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्षा झालेला कैदी वेन्सिल रॉय मिरिंडा उर्फ मॉन्टी (कैदी नंबर ९९८६) याच्याकडे मोबाइल आढळून आला़ त्याच्याकडील मोबाइल जप्तीची कारवाई सुरू असतानाच त्याने बाबर यांच्या अंगावर धाऊन मारहाण केली़ यामध्ये बाबर जखमी झाले असून, त्यांनी या प्रकरणीपोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ मध्यवर्ती कारागृहातील सुरू असलेल्या झडतीत कैदी संजय रणधीर पवार (रा़ जुने, नाशिक) हा प्लास्टिकच्या बकेटमध्ये मोबाइल लपवून जात असताना तुरुंग अधिकारी संतोष कारथोरे यांनी पकडले़ त्याच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ कारागृहातील कैद्यांकडे सापडत असलेल्या मोबाइल प्रकरणातून तीन वरिष्ठ तुरुंग अधिकारी कैलास भवर, गणेश मानकर, सुनीलकुमार कुवर यांना निलंबितही करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)