नाशिकरोडला कैद्याची पोलिसाला मारहाण
By Admin | Updated: January 15, 2015 23:58 IST2015-01-15T23:57:36+5:302015-01-15T23:58:00+5:30
पळण्याचा प्रयत्न फसला : पत्र्याने केला हल्ला

नाशिकरोडला कैद्याची पोलिसाला मारहाण
नाशिकरोड : नाशिकरोड न्यायालयातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्याला पकडल्यानंतर त्याने पकडणाऱ्या पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी इतर उपस्थित पोलीस मदतीला न धावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी विजयकुमार अनंतकुमार रॉय याला काही दिवसांपूर्वी वैद्यकीय तपासणी करून पुन्हा कारागृहात दाखल करण्यासाठी आणण्यात आले. यावेळी कैदी विजयकुमार रॉय याने कारागृहाच्या प्रवेशद्वारावर देसाई नावाच्या कॉन्स्टेबलवर पत्र्याच्या तुकड्याने हल्ला करून जखमी केले होते. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यासंदर्भात सुनावणीसाठी आरोपी विजयकुमार रॉय याला गुरुवारी दुपारी नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. गंभीर दुखापतीच्या गुन्ह्याच्या वेळी कैदी पार्टीत असलेले पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल शिवाजी वारुंगसेदेखील न्यायालयात साक्षीसाठी आले होते.
नाशिकरोड न्यायालयाच्या व्हरांड्यात बसलेला आरोपी विजयकुमार रॉय हा सिगारेट पिऊ देण्याची मागणी करत होता. त्याला कैदी पार्टीच्या पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर तो अचानक उठून पळून जाऊ लागला. यावेळी साक्ष देण्यासाठी आलेला कॉन्स्टेबल शिवाजी वारुंगसे याने त्याला पाठलाग करून न्यायालयाच्या आवारातच पकडले. मात्र त्यानंतर संतापलेल्या विजयकुमार रॉय याने त्याला पकडणारा कॉन्स्टेबल शिवाजी वारुंगसे याला शिवीगाळ करत चांगलीच मारहाण केली. न्यायालयातच सर्वांसमोर हा प्रकार घडला. (प्रतिनिधी)