नाशिकरोड प्रभागसभेमध्ये खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:24 IST2017-10-31T00:24:13+5:302017-10-31T00:24:21+5:30
प्रभाग समितीच्या बैठकीला संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहिल्याबाबत त्यांना नोटीस बजविण्यात यावी. बंद पथदीपावरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली.

नाशिकरोड प्रभागसभेमध्ये खडाजंगी
नाशिकरोड : प्रभाग समितीच्या बैठकीला संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहिल्याबाबत त्यांना नोटीस बजविण्यात यावी. बंद पथदीपावरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक सोमवारी दुपारी प्रभाग सभापती अनिता सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला विविध विभागांचे १६ पैकी फक्त तीन विभागप्रमुख उपस्थित होते. यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत आम्ही कामे कोणाला सांगायची, निर्णय घेणारे, प्रस्ताव तयार करणारे अधिकारी उपस्थित राहत नसतील तर जनतेची कामे कशी होणार, नागरिकांना आम्हाला उत्तरे द्यावी लागतात, असे स्पष्ट केले. आजारी असल्याचे व बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे पहिलेच अधिकारी कळवत असतील तर प्रभागाच्या बैठकीचा फायदा काय? असा प्रश्न विचारून अनुपस्थित असलेल्या अधिकाºयांना नोटीस बजविण्यात यावी. यापुढील बैठकीला सर्व अधिकारी कोणतेही कारण न देता उपस्थित राहिले पाहिजे, अशी मागणी सर्वच नगरसेवकांनी केली. अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. नाशिकरोड परिसरात अनेक ठिकाणी पथदीप बंद असून, तक्रारी करूनसुद्धा पथदीप सुरू होत नाही. जुने धोकादायक गंजलेले विद्युत पोल बदलत नाही. अशा विद्युत विभागाच्या कामांवरून चांगलीच खडाजंगी झाली. विद्युत साहित्य नसल्याचे सांगून संबंधित अधिकारी टोलवाटोलवी करतात, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली. बैठकीला नगरसेवक सुनीता कोठुळे, ज्योती खोले, जयश्री खर्जुल, डॉ. सीमा ताजणे, मीरा हांडगे, संगीता गायकवाड, सरोज आहिरे, रंजना बोराडे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, पंडित आवारे, शरद मोरे, संतोष साळवे, केशव पोरजे, विशाल संगमनेरे, अंबादास पगारे व अधिकारी उपस्थित होते.