नाशिकरोडला कडकडीत बंद
By Admin | Updated: November 6, 2014 00:22 IST2014-11-05T23:37:05+5:302014-11-06T00:22:20+5:30
जवखेडे हत्त्याकांड घटनेचा निषेध मोर्चा; विविध संघटनांचा सहभाग

नाशिकरोडला कडकडीत बंद
नाशिकरोड : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्त्याकांडाच्या निषेधार्थ नाशिकरोडला कडकडीत बंद पाळण्यात येऊन निषेध मोर्चा काढण्यात आला. बंद काळात कुठलीही अनुचित घटना घडली नाही.
जवखेडे येथील जाधव कुुटुंबीयांच्या निर्घृण हत्त्याकांडाच्या निषेधार्थ व अद्यापही आरोपींना अटक न झाल्याच्या निषेधार्थ जातीय अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने आज बंदची हाक देण्यात आली होती. यामुळे सकाळपासून अनेक व्यापारी आपली दुकाने न उघडता बंदमध्ये सहभागी झाले होते. यामुळे नाशिकरोडची बाजारपेठ व रस्त्यावरील गर्दीदेखील नेहमीपेक्षा अत्यंत कमी होती. अनेक भागांत तर सामसूम पसरलेली होती.
जेलरोड, भीमनगर येथून सकाळी ११ वाजेच्या सुमारास कृती समितीच्या वतीने शासन, पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा देत निषेध मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा बिटको चौकात दाखल झाल्यानंतर विविध पक्ष, संघटना, मंडळाचे कार्यकर्ते, भाजीपाला विक्रेते मोर्चात सहभागी झाले. बिटको चौकातून मोर्चा शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, सुभाषरोड, सत्कार पॉर्इंट, मुक्तिधाममार्गे बिटको चौकापर्यंत काढण्यात आला. निषेध मोर्चाच्या आवाहनामुळे सर्वांनीच आपले व्यवहार, व्यवसाय बंद करून घेतल्याने सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला.
बिटको चौकात मोर्चाच्या समाप्तीनंतर झालेल्या चौकसभेत माजी नगरसेवक गणेश उन्हवणे, दीपक नन्नावरे, शशिकांत उन्हवणे यांनी जाधव हत्त्याकांडाची सीबीआय चौकशी करावी, तसेच तपासामध्ये
हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली.
यावेळी फकिरा जगताप, हिरामण वानखेडे, रामभाऊ जगताप, आकाश भालेराव, अनिल गांगुर्डे, दिनेश निकाळजे, देवीदास डोखे आदिंसह विविध पक्ष, संघटना, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बंद काळात कुठलाही अनुचित
प्रकार घडला नाही. सहायक पोलीस आयुक्त हेमराजसिंह राजपूत
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)