नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण
By Admin | Updated: May 20, 2017 00:43 IST2017-05-20T00:41:31+5:302017-05-20T00:43:52+5:30
नायगाव : प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाच्या कामास पुन्हा प्रारंभ झाला आहे

नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण
दत्ता दिघोळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नायगाव : प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाच्या कामास पुन्हा प्रारंभ झाला आहे. गेल्या दहा वर्षांपासून या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे घोंगडे भिजत पडले असून, पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्यात येत आहे. सदर सर्वेक्षण अंतिम असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांकडून केला जात असून, त्यानंतर लोहमार्गाच्या पुढील कामास वेग येणार आहे.
नाशिक-पुणे या २६६ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सध्या सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात हे काम सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून जायगाव, वडझिरे शिवारात सर्व्हे करण्यात येत आहे. यासाठी दोन पथके नेमण्यात आली असून, पहिले पथक लाइनआउट करून निशाण्या करत आहे, तर दुसरे पथक निशाणी केलेल्या ठिकाणाहून २५ मीटरचा सर्व्हे करून दिशा ठरवत आहेत. प्रस्तावित नाशिक-पुणे लोहमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पुणे येथील कोथरुडच्या मे. हायड्रोपनियम सिस्टीम या कंपनीकडे असल्याचे समजते. नाशिक-पुणे रेल्वेमार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. या लोहमार्गासाठी यापूर्वी दोन ते वेळा सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र सर्वेक्षणानंतर कोणत्याही हालचाली न झाल्याने दहा वर्षांपासून या प्रकल्पाची गाडी सर्वेक्षणाच्या स्थानकावरच थांबून असल्याचे चित्र होते. नाशिक व पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा जवळचा मार्ग ठरणार आहे. यातील ६२ किलोमीटर अंतर नाशिक जिल्ह्यातून जात आहे, तर ५९ किमी शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यातून जाणार आहे. बाकीचा १४५ किमीचा रेल्वेमार्ग पुणे जिल्ह्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सर्वेक्षणाचे काम करण्यात आले होते. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळे फाटा,
बोटा परिसरात सर्वेक्षणाचे काम झाले आहे.
पुन्हा नव्याने सर्वेक्षण
नाशिक आणि पुणे ही दोन्ही शहरे जवळच्या लोहमार्गाने जोडण्यासाठी नवा लोहमार्ग तयार करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विषय घेतला जातो. मागील पाच रेल्वेमंत्र्यांनी हा विषय रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केला होता. सद्यस्थितीतल्या नव्या मार्गासाठी पुन्हा नव्याने सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नाशिकहून पुण्याला रेल्वेने जाण्यासाठी कल्याण, पनवेल व कर्जतमार्गे जावे लागते. त्यामुळे प्रवासाचा वेळ व जास्त खर्च होतो. त्यातून सध्याच्या रेल्वेसेवेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने सर्व्हेनुसार हा रेल्वेमार्ग नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, आळे फाटा, राजगुरुनगर असा असणार आहे.