नाशिक - महापालिकेत यापूर्वी नदीपात्रातील गाळ-घाण-कचरा काढण्यासाठी रोबोट मशिनची खरेदी वादग्रस्त ठरलेली असताना आरोग्य समितीच्या सभेत आणखी एक रोबोट मशिन खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश सभापती सतीश कुलकर्णी यांनी प्रशासनाला दिले. दरम्यान, नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी सोडणा-या कंपन्यांवर कारवाई करण्याची सूचनाही सभापतींनी केली.आरोग्य व वैद्यकीय समितीची सभा सभापती सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, गोदावरी संवर्धन कक्षाचे प्रमुख उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले, गोदावरी नदीतील पाणवेली व गाळ काढण्याचे कंत्राट दिले असून दोन दिवसांपासून पात्र स्वच्छतेचे काम सुरू आहे. नंदिनी नदीपात्रातील गाळ-कचराही रोबोट मशिनद्वारे काढला जात आहे. सदर रोबोट मशिन एकच असल्याने महिनाभरासाठी ते नंदिनी नदीपात्रातील स्वच्छतेसाठीच ठेवण्यात येणार आहे. याशिवाय,नंदिनी नदीपात्रात घाण-कचरा टाकू नये, याकरीता सूचना फलक लावण्याची सूचना बांधकाम विभागाला करण्यात आल्याचेही दोरकुळकर यांनी सांगितले. यावर, सभापतींनी एक रोबोट मशिन पुरेसे ठरत नसल्याने आणखी एक रोबोट मशिन खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यावेळी, पर्यावरण विभागाचे प्रमुख वंजारी यांनी नंदिनी नदीपात्रात रासायनिक सांडपाणी सोडणा-या कंपन्यांविषयी प्रदुषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीकडे तक्रार केल्याचे सांगितले. मात्र, सभापतींनी अशा कंपन्यांवर महापालिकेचे नियंत्रण असले पाहिजे, असे सांगत त्यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेश दिले. उपसभापती योगेश शेवरे यांनी सातपूर विभागातील मायको दवाखान्यातील असुविधांकडे लक्ष वेधले. त्याबाबत सभापतींनी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेशित केले. केंद्र सरकारच्या पथकामार्फत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी सादर केली. सद्यस्थितीत पाच व्यक्तींच्या पथकामार्फत ‘फेस टू फेस’ माहिती घेतली जात आहे तर आतापर्यंत ३००० नागरिकांनी स्वच्छतेविषयी प्रतिक्रिया नोंदविल्याचेही बुकाणे यांनी सांगितले. शहरात एकूण ४६८ कच-याचे ब्लॅकस्पॉट आहेत. त्यातील ४१ ब्लॅकस्पॉटच बंद होऊ शकले आहेत. ब्लॅकस्पॉटभोवती आसपास राहणा-या नागरिकांना कचरा न टाकण्याबाबतचे पत्र तत्काळ देण्याची सूचना सभापती सतीश कुलकर्णी यांनी केली. सभेला हर्षदा गायकर, रुपाली निकुळे या सदस्य उपस्थित होत्या तर अधिकारीही झाडून उपस्थित होते.टाकावू साहित्य हटविण्याचे आदेशमहापालिका रुग्णालये, दवाखान्यांमध्ये पडून असलेले टाकावू साहित्य हटविण्याचे आदेश सभापतींनी दिले. यावर वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी सदर साहित्य हटविण्याच्या फाईलवर आयुक्तांची स्वाक्षरी झाली असून येत्या पाच दिवसात साहित्याची विल्हेवाट लावली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
नाशिक महापालिकेकडून आणखी एक रोबोट मशिन खरेदीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 15:13 IST
आरोग्य समिती सभा : सभापतींचे आदेश; यापूर्वीची मशिन खरेदी वादात
नाशिक महापालिकेकडून आणखी एक रोबोट मशिन खरेदीचा प्रस्ताव
ठळक मुद्देनदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी सोडणा-या कंपन्यांवर कारवाई करण्याची सूचनाब्लॅकस्पॉटभोवती आसपास राहणा-या नागरिकांना कचरा न टाकण्याबाबतचे पत्र तत्काळ देण्याची सूचना