नाशिक महापालिकेची रणधुमाळी सुरू
By Admin | Updated: January 12, 2017 00:05 IST2017-01-12T00:05:19+5:302017-01-12T00:05:36+5:30
आचारसंहिता लागू : २१ फेब्रुवारी रोजी मतदान, २३ रोजी निकाल

नाशिक महापालिकेची रणधुमाळी सुरू
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान, तर दि. २३ फेबु्रवारी २०१७ रोजी मतमोजणी होणार आहे. येत्या २१ जानेवारी रोजी अंतिम मतदारयादी घोषित झाल्यानंतर दि. २७ जानेवारी ते ३ फेबु्रवारी या काळात उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची घोषणा केल्यानंतर बुधवारी (दि.११) सायंकाळी ५ वाजेपासूनच आचारसंहिता लागू झाली. दरम्यान, निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, राजकीय पक्षांच्याही हालचाली गतिमान झाल्या आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक काळाची मुदत १४ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या घोषणेकडे राजकीय पक्षांसह इच्छुकांचे लक्ष लागून होते. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आणि लगेच आचारसंहिता लागू झाली. महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती होणार आहे. त्यामुळे पंधरा दिवसांच्या कालावधीत प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी पक्षकार्यालये गजबजणार असून, खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्याने राजकीय पक्षांच्याही हालचाली गतिमान झाल्या आहेत. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम घोषित झाल्यानंतर महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. महापालिकेने तातडीने शहरात निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांची वाहने जमा करण्यात आली आहे.