नाशिक : गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या नाशिक मर्चंट को-आॅप. बँकेची निवडणूक अखेर मार्गी लागली असून, निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जारी करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकमधीलच नव्हे तर उत्तर महाराष्टतील सर्वांत मोठी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँक म्हणून नामकोची ओळख आहे. बॅँकेच्या कामकाजावर अनियमिततेचा ठपका ठेवून रिझर्व बॅँकेने या बॅँकेवर प्रशासक नियुक्त केले आहे. तथापि, प्रशासकांचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, त्यांच्या कारकिर्दीत अनुत्पादक मालमत्ता तरतूद वाढण्याबरोबरच अन्य अनेक प्रकारच्या गैरप्रकारांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप माजी संचालक आणि सभासदांकडून केला जात होता. नामकोच्या वार्षिक सभांमध्ये संचालक मंडळाच्या निवडणुका घेण्याचे ठराव करूनही प्रशासक भोरिया यांनी ते रिझर्व बॅँकेकडे न पाठविल्याने गेल्या वर्षी गोंधळ झाला होता. यंदा भोरिया यांनी प्रस्ताव पाठवला शिवाय रिझर्व बॅँकेने भोरिया यांना नामकोत पाच वर्षे पूर्ण होण्याच्या आत म्हणजे जानेवारी महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यासंदर्भात पुढील कार्यवाही होत नव्हती मात्र आता केंद्रीय निबंधकांनी मिलिंद भालेराव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, त्यामुळे डिसेंबर महिन्यात निवडणुका होणे अटळ ठरले आहे. भालेराव यांनी मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित केला असून, मंगळवारी (दि.३०) प्रारूप मतदार यादी घोषित केली आहे. बॅँकेच्या संकेतस्थळावरदेखील ती उपलब्ध आहे. प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत आलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे, तर अंतिम मतदार यादी १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.या बॅँकेचे १ लाख ८० हजार सभासद आहेत. बॅँकेचे दोन प्रस्थापित पॅनल अगोदरच तयार झाले आहेत, तर बॅँकेचे सर्र्वेसर्वा (कै.) हुकूमचंद बागमार यांचे सुपुत्र अजित बागमार यांनी नम्रता याच पॅनलने प्रचार सुरू केला आहे.
नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीचा वाजला बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:08 IST