नाशिक बाजार समितीत लिलाव पूर्ववत सुरू
By Admin | Updated: July 15, 2016 01:19 IST2016-07-15T01:05:51+5:302016-07-15T01:19:19+5:30
बंद मागे : व्यापारी-आडत्यांमध्ये झाला समझौता

नाशिक बाजार समितीत लिलाव पूर्ववत सुरू
पंचवटी : गेल्या सहा दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत प्रकरणावरून व्यापाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आडत वसुलीची टक्केवारी कमी केल्याने मिटला आहे. त्यामुळे सायंकाळपासून लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत. बाजार समितीत पूर्वी शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी ६ टक्के आडत आता आडते व्यापाऱ्यांकडून २.७५ टक्के दराने वसूल करणार आहेत, हा व्यापारी आणि आडत्यांमध्ये समझौता झाल्यानंतर संप मिटला आहे.
शासनाने काही दिवसांपूर्वी आदेश काढून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी ६ टक्के आडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदार व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश दिले होते. शासनाचे आदेश चुकीचे असून आडत व्यापारी देणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेत गेल्या सहा दिवसांपासून लिलाव बंद केले होते. लिलाव बंद केल्याने शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल कवडीमोल बाजारभावाने विक्री करावा लागत होता. तर शासनाने निर्णय न बदलल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा आडते व व्यापाऱ्यांनी दिला होता. मात्र बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत शासनाने व्यापाऱ्यांकडूनच आडत वसूल करावी, असे स्पष्ट केल्याने सायंकाळी राज्यातील काही बाजार समित्यातील व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला होता, तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी संप कायम ठेवत व्यापारी व आडत्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. गुरुवारी सकाळी आडते व व्यापाऱ्यांची पुन्हा संयुक्त बैठक झाली. त्यात सुरुवातीला व्यापाऱ्यांनी आडत देण्यास विरोध दर्शविला, मात्र नंतर व्यापाऱ्यांनी नमते पाऊल घेत ६ टक्केऐवजी २.७५ टक्के आडत्यांनी व्यापाऱ्यांकडून आडत वसूल करावी, असे मान्य केल्याने संप मिटला. संपामुळे गेल्या सहा दिवसांपासून बाजार समितीत शुकशुकाट पसरला होता, तर आता संप मिटल्याने शुक्रवारी (दि.१५) बाजार समितीचा आवार पुन्हा गजबजणार असून, शेतमालाची विक्रमी आवक होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. (वार्ताहर)