नासाका चालविण्याची नाशिक बाजार समितीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:34+5:302021-07-09T04:10:34+5:30
आज ना उद्या कारखाना चालू होईल, या आशेवर बसलेल्या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आशा पूर्ण होण्याची चिन्हे सध्या दिसू ...

नासाका चालविण्याची नाशिक बाजार समितीची तयारी
आज ना उद्या कारखाना चालू होईल, या आशेवर बसलेल्या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आशा पूर्ण होण्याची चिन्हे सध्या दिसू लागली आहेत. बाजार समितीची शुक्रवारी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून, शेतकरी, कर्मचारी आणि सभासदांच्या हिताचा विचार करून आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती प्रयत्नशील असल्याची माहिती सभापती पिंगळे यांनी दिली आहे.
‘नासाका’मध्ये पूर्वी १२०० कर्मचारी कार्यरत होते. सुमारे ९ कोटी रुपये वेतनावर खर्च होत होते. कर्मचारी वाढविल्यामुळे कारखाना अडचणीत आला होता. आता १३४ कर्मचारी असल्याने वेतनावर वर्षाला एक ते दीड कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे वर्षाला सात ते आठ कोटी रुपयांची बचत होणार आहे. आपण नासाकाची जेव्हा सूत्रे स्वीकारली तेव्हा ८४ कोटी रुपये कर्ज होते. पदभार सोडला तेव्हाही ८४ कोटीच कर्ज होते. ८० हजार पोती साखर शिल्लक होती. ती १६ रुपये प्रति किलोने विक्री करण्यात आली. ती जर ३२ रुपये दराने विक्री केली असती तर ती रक्कम कारखान्याला मिळाली असती, असेही पिंगळे म्हणाले.
गेल्या सात वर्षांपासून नासाकाही बंद असून, मी स्वत: व आमदार सरोज आहिरे यांनी कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. साखर कारखाना सुरू झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न मार्गी लागणार असून, १३४ कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळेल. असेही सभापती पिंगळे यांनी सांगितले.