एमपीएससीत प्रथम आलेला अहिरे ठरला नाशिकभूषण
By Admin | Updated: March 16, 2017 23:41 IST2017-03-16T23:40:54+5:302017-03-16T23:41:13+5:30
नाशिक : मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने अभ्यासक्रम करून एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेला भूषण अशोक अहिरे हा खऱ्या अर्थाने नाशिकभूषण ठरला आहे.

एमपीएससीत प्रथम आलेला अहिरे ठरला नाशिकभूषण
नाशिक : मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने अभ्यासक्रम करून एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेला भूषण अशोक अहिरे हा खऱ्या अर्थाने नाशिकभूषण ठरला आहे. त्याच्या यशाच्या निमित्ताने नाशिकला राज्यस्तरावर यश प्राप्त झाले आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी म्हणून करिअर करण्याचे स्वप्न साकार झालेच; परंतु राज्यात प्रथम येण्यामुळे आनंद शतगुणीत झाल्याची भावना भूषण याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
नाशिकच्या विजय ममता चित्रपटगृहामागील रॉयल कॉलनी येथे राहणाऱ्या भूषण अहिरे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गेल्यावर्षी घेतलेल्या एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत ५२६ गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना. भूषण याने सांगितले की, स्पर्धा परीक्षेची तयारी चार वर्षांपासून सुरू केली होती. २०१४ मध्ये अवघ्या एका गुणाने त्याची पोलीस उपअधीक्षकपदाची संधी हुकली. त्याचे शल्य मनामध्ये होते. त्याऐवजी मंत्रालयात डेस्क आॅफिसर म्हणून नियुक्ती मिळाली होती. ती न स्वीकारता एक वर्ष आणखी सराव करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचे मी ठरवले होते. त्यानुसार अभ्यास केला. माझ्या शिक्षक आणि सहकारी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यात पहिल्या पाचमध्ये माझा क्रमांक असेल असे मला वाटत होेते, परंतु थेट राज्यात प्रथम येईल, अशी खात्री नव्हती. आज या यशामुळे माझी स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद होत असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
मूळचा सटाणा तालुक्यातील गोराणे येथील रहिवासी असलेल्या अहिरे कुटुंबात भूषणचे आई आणि वडील दोघेही शिक्षक आहेत. वडील अशोक अहिरे हे भगूर येथील नूतन विद्या मंदिरात मुख्याध्यापक आहेत. तर आई सुनीता या जिल्हा परिषदेच्या शेवगे दारणा येथील शाळेत पदवीधर शिक्षिका आहेत. भूषण याने शालेय शिक्षण नूतन विद्या मंंदिरात घेतले तर बारावीपर्यंतचे शिक्षण केटीएचएम महाविद्यालयात घेतले. त्यानंतर भुजबळ नॉलेज सिटीत अभियांत्रिकीची पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर त्याला अनेक खासगी कंपन्यांच्या आॅफर्स आल्या होत्या. परंतु बड्या पॅकेजच्या नोकऱ्या सोडून सरकारी अधिकारी म्हणून करिअर करण्याचे ठरवले. आहिरे दाम्पत्याला भूषण हा एकुलता एक मुलगा असून त्याने ‘भूषण’ म्हणून खऱ्या अर्थाने नाव सार्थ केल्याची भावना त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.
भूषण अत्यंत हुशार आणि अभ्यासू मुलगा आहे. त्याने कायम यश मिळविले आणि आता उपजिल्हाधिकारी म्हणून त्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून यश मिळविले आहे. भूषण हे नाव त्याने सार्थक केले आहे.
- सुनीता अहिरे, आई