लहरी वातावरणामुळे नाशिककर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2016 23:11 IST2016-02-08T23:03:55+5:302016-02-08T23:11:20+5:30
उन्हाचा कडाका : हवामानाचा आरोग्यावरही परिणाम

लहरी वातावरणामुळे नाशिककर त्रस्त
नाशिक : सकाळी गुलाबी थंडी, तर दुपारी उन्हाचा कडाका अशा लहरी हवामानाच्या स्थितीमुळे सध्या नाशिककर त्रस्त झाले आहेत. शहरात कमाल ३१ अंश सेल्सिअस व किमान १० अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली असून, या लहरी हवामानाचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे.
नाशिक शहर व परिसरात सकाळी घरातून निघताना असलेल्या गारव्यामुळे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सोबत सनग्लास, टोपी यांसारख्या संरक्षक वस्तू सोबत न घेताच बाहेर पडल्यानंतर दुपारच्या सुमारास मात्र उन्हाचा चटका जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ऊन वाढल्याने दुपारच्या वेळी बाजारात शुकशुकाट दिसत असून, त्याचा व्यवसायावरही परिणाम होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. फेब्रुवारीच्या पूर्वार्धातच उन्हाचा कडाका वाढल्याने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या सावलीचा आश्रय घेत आहेत, तर महिलावर्ग चेहऱ्याला स्कार्प अथवा रुमाल बांधून उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दिवसभरात सकाळी थंडी दुपारी कडाक्याचे ऊन, सायंकाळी पुन्हा हवेतला गारवा यामुळे सध्या नाशिककर या लहरी वातावरणाच्या अनुभव घेत असून, बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ डॉक्टर व्यक्त करत आहेत. दुपारच्या वेळी शहरात कमाल ३१ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली असून, या उन्हात लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडून नये असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. या लहरी वातावरणाचा त्यांना अधिक त्रास होण्याची शक्यता
आहे. (प्रतिनीधी)