कर्जबाजारी नाशिक कारखान्यावर अखेर ‘टाच’
By Admin | Updated: January 13, 2016 00:08 IST2016-01-13T00:08:15+5:302016-01-13T00:08:34+5:30
जिल्हा बॅँकेने केली मालमत्ता जप्त

कर्जबाजारी नाशिक कारखान्यावर अखेर ‘टाच’
नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्यावरील थकीत १०७ कोटींच्या वसुलीसाठी मंगळवारी (दि. १२) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पथकाने अखेर जप्तीची कारवाई केली. या कारवाईत नासाका कार्यक्षेत्रावर जिल्हा बॅँकेचा फलक लावण्यात आला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने नाशिक सहकारी साखर कारखान्याकडील थकीत १०७ कोटींच्या वसुलीसाठी कारखान्याला यापूर्वी दोनदा कायदेशीर नोटिसा बजावल्या होत्या. मात्र कारखाना सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे पाहून अखेर १६ जणांच्या पथकासह जिल्हा बॅँकेचे एक पथक नाशिक साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी पळसे येथील कारखान्याच्या (पान ९ वर)
कार्यक्षेत्रावर पोहोचले. तेथे तानाजी गायधनी यांच्यासह २५ ते ३० सभासदांनी त्यांना कारखान्याच्या जप्तीबाबत विचारणा करतानाच वसुलीसाठी कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करू नका. कारण कारखान्यावर कर्ज १०७ कोटींचे असताना प्रत्यक्षात कारखान्याची चल-अचल मालमत्ता सुमारे २२० कोटींची असल्याचे सांगितले. जिल्हा बॅँकेच्या वसुली पथकाने पोलिसांच्या उपस्थितीत पंचासमक्ष कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर जिल्हा बॅँकेचा एक फलक लावत १०७ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी कारखान्याची चल-अचल मालमत्ता जप्त करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. कारखान्यावर जप्तीची कारवाई झालेली असली तरी प्रत्यक्षात वसुलीसाठी नासाकाच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)