नाशिक जिल्हा सध्यातरी ‘बर्ड फ्लू’मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:36 IST2021-01-13T04:36:30+5:302021-01-13T04:36:30+5:30
नाशिक: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाल्याबाबतचे संकेत मिळत असतांना नाशिक जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची एकही केस निदर्शनास ...

नाशिक जिल्हा सध्यातरी ‘बर्ड फ्लू’मुक्त
नाशिक: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाल्याबाबतचे संकेत मिळत असतांना नाशिक जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची एकही केस निदर्शनास आली नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या संदर्भात अफवा पसरली जात असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग होत असल्याचे समेार आल्यानंतर राज्य शासनाकडून सर्वत्र खबरदारीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संपर्क साधून बर्ड फ्लूच्या संदर्भात देण्यात आलेल्या निर्देशनाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या आनुषंगाने जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून तसेच जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बर्ड फ्लू संदर्भात नागरिकांमध्ये अनेक प्रश्न असल्याने त्याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावर झालेला आहे. नाशिक जिल्ह्यातदेखील या व्यवसावर परिणाम झाल्याचे समोर आल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबत नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले की, आपल्या जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची एकही केस अद्यापपर्यंत निदर्शनास आलेली नाही. बर्ड फ्लूच्या भीतीमुळे कोविड युद्धामध्ये उपयोगी ठरणाऱ्या प्रोटीनच्या आहारावर त्याचा परिणाम झाला आहे. आहारातील असा कोणताही बदल करण्याची आवश्यकता नसून जोपर्यंत अधिकृत कोणतीही माहिती समोर येत नाही तोपर्यंत घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
बर्ड फ्लूच्या भीतीचा थेट परिणाम जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांवर झालेला आहे. त्यामुळे हा व्यवसायदेखील संकटात आल्याने या व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. काहींनी केवळ अफवांमुळे आपल्या आहरात बदल केला. अशा अफवांमुळे पोल्ट्री व्यावसायिकांना अधिकाधिक फटका बसत आहे. त्याचा परिणाम गेल्या तीन ते चार दिवसांपासून प्रामुख्याने दिसू लागला आहे.
--कोट--
अफवांवर विश्वास ठेवू नये--
जिल्ह्यात बर्ड फ्लूचा कोणत्याही प्रकाराचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवता आहार सुरू ठेवावा. काही काळजीचे कारण असल्यास तातडीन अधिकृत माहीत प्रसारित केली जाईल.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी