थकबाकीदारांच्या घरापुढे वाजणार ‘नाशिक ढोल’
By Admin | Updated: March 5, 2017 01:11 IST2017-03-05T01:11:39+5:302017-03-05T01:11:56+5:30
नाशिक : घरपट्टी थकविणाऱ्या मिळकतधारकांकडून वसुली करण्यासाठी महापालिकेने आता थकबाकीदारांच्या घरापुढे जाऊन ‘नाशिक ढोल’ वाजविण्याचे ठरविले आहे.

थकबाकीदारांच्या घरापुढे वाजणार ‘नाशिक ढोल’
नाशिक : घरपट्टी थकविणाऱ्या मिळकतधारकांकडून वसुली करण्यासाठी महापालिकेने आता थकबाकीदारांच्या घरापुढे जाऊन ‘नाशिक ढोल’ वाजविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे येत्या सोमवार (दि.६) पासून कुणाच्या घरासमोर ढोल वाजताना दिसले तर तो मनपाचा थकबाकीदार असल्याचे समजा. आपली इभ्रत वेशीवर टांगली जाऊ नये, यासाठी आता थकबाकीदार वसुली पथकाला कितपत प्रतिसाद देतात, हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे.
शासनाने राज्यातील सर्व महापालिकांना घरपट्टी व पाणीपट्टीची १०० टक्के वसुली करण्याचे आदेश काढले आहेत. त्यासाठी आयुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार, महापालिकेने गेल्या २ मार्चपासून सहाही विभागात प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण १८ वसुली पथके स्थापन केली आहेत. सदर पथकांकडून वसुलीचे प्रयत्न सुरू असले तरी बड्या थकबाकीदारांकडून अजूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने आता बड्या थकबाकीदारांकडे विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्याकडून थकबाकी वसुलीसाठी थेट घरासमोरच नाशिक ढोल वाजवून लक्ष वेधले जाणार आहे. येत्या सोमवार (दि.६) पासून महापालिकेमार्फत ढोल पथकाच्या साहाय्याने ही वसुलीची कार्यवाही केली जाणार असून, त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या पोलिसांकडून घेतल्या जात आहेत. सुमारे ३२०० थकबाकीदार असून, त्यात टॉप टेन असलेल्या बड्या थकबाकीदारांकडे लाखोची थकबाकी प्रलंबित आहे.
यापूर्वी बड्या थकबाकीदारांना मनपाने वारंवार नोटिसा बजावूनही त्यांच्याकडून भरणा झालेला नाही, तर काही थकबाकीदारांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आता शासनानेच वसुलीचे आदेश दिल्याने महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. बड्या थकबाकीदारांमध्ये काही नामवंत बिल्डर्स, शिक्षणसंस्था, धार्मिक व सामाजिक संस्थांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)