नाशिकचे उपजिल्हाधिकारी देणार उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांना धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST2021-08-27T04:19:13+5:302021-08-27T04:19:13+5:30
नाशिक : पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तेथील अधिकाऱ्यांना निवडणुकीचे कायदे शिकविण्यासाठी नाशिकचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांची ...

नाशिकचे उपजिल्हाधिकारी देणार उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांना धडे
नाशिक : पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तेथील अधिकाऱ्यांना निवडणुकीचे कायदे शिकविण्यासाठी नाशिकचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांची निवड भारत निवडणूक आयोगाने केली आहे. गोरखपूर येथे ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत ते तेथील निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. देशभरातून नियुक्त करण्यात आलेल्या १३ अधिकाऱ्यांपैकी आनंदकर हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी आहेत.
विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे उपजिल्हाधिकारी तथा प्रबंधक आनंदकर यांना याबाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत. आनंदकर हे भारत निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय स्तरावरील निवडणूकविषयक कायदे, नियम, प्रणाली व कार्यपद्धतीविषयक तज्ज्ञ अधिकारी असून ते भारत निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय स्तरावरील निवडणूकविषयक तज्ज्ञ तथा मार्गदर्शक अधिकारी आहेत. त्यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी या पदावर काम केले आहे. भारत निवडणूक आयोगाचे तज्ज्ञ मार्गदर्शक अधिकारी म्हणून त्यांनी महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच दिल्ली येथे देशभरातील विविध राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवडणूकविषयक प्रशिक्षण दिले आहे. नुकत्याच सन २०२१ मध्ये झालेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी तेथील अधिकाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा भारत निवडणूक आयोगाने त्यांची नियुक्ती केलेली होती.
250821\014525nsk_40_25082021_13.jpg
अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी तथा प्रबंधक विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था