राज्यात नाशिक सर्वाधिक थंड
By Admin | Updated: January 11, 2017 22:47 IST2017-01-11T22:47:07+5:302017-01-11T22:47:28+5:30
सातत्याने घसरण : नाशिककर गारठले; पारा ५.८ अंशावर

राज्यात नाशिक सर्वाधिक थंड
नाशिक : राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून अग्रस्थानावर आहे. अहमदनगर, महाबळेश्वर, सातारा अशा सर्वच शहरांपेक्षा नाशिकमध्ये थंडीचा कडाका मागील चार दिवसांपासून सर्वाधिक आहे. किमान तपमानात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे नाशिककर गारठले आहेत. बुधवारी (दि. ११) सकाळी किमान तपमानाचा पारा ५.८ अंशावर स्थिरावला. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून, पारा ५ अंशावर आला आहे. निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तपमानात घसरण होत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिककर चांगलेच गारठले असून, आतापर्यंत या हंगामातील सर्वात नीचांकी तपमानाची नोंद बुधवारी हवामान खात्याकडून करण्यात आली. मंगळवारी ६.५ अंशावर शहराचे किमान तपमान होते. बुधवारी पहाटेपासून तर संध्याकाळपर्यंत हवेमध्ये गारठा जाणवत होता, त्यामुळे नोकरदार व श्रमिक नाशिककरांनी उबदार कपडे परिधान करणे पसंत केले होते. अहमदनगरचे किमान तपमान ७.१, मालेगाव ७.४, पुणे ७.७, सातारा १०.०, सांगली ११.५, सोलापूर १०.७, उस्मानाबाद ८.४, अकोला ९.५, अमरावती ९.२, महाबळेश्वर १२.० असा प्रमुख शहरांचा पारा पुण्याच्या वेधशाळेने नोंदविला.
नाशिकचा इतिहास बघता दरवर्षी जानेवारी महिना कडाक्याच्या थंडीचा राहिला आहे. २०१५ साली २५ डिसेंबरला हंगामातील ५.४ अंश इतक्या नीचांकी तपमानाची नोंद करण्यात आली होती. तसेच २०१६ मध्ये २२ जानेवारीला ५.५ नीचांकी तपमान नोंदविले गेले होते.
आठवडाभरापासून सातत्याने नाशिकच्या थंडीमध्ये वाढ होत असून, नाशिककर गारठले आहे. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वाधिक थंडीचा कडाका जाणवत आहे. निफाडला सध्या पारा ५ अंशापर्यंत घसरला आहे. यामुळे शेतीकामांवरही परिणाम झाला असून, गहू पिकासाठी थंडी पोषक असली तरी द्राक्ष उत्पादक मात्र धास्तावले आहेत. (प्रतिनिधी)