नाशिक चॅलेंजर्सची विजयी हॅट्ट्रिक
By Admin | Updated: December 26, 2016 02:48 IST2016-12-26T02:48:10+5:302016-12-26T02:48:29+5:30
लोकमत एनपीएल क्रिकेट स्पर्धा : दोन्ही संघांकडून गोलंदाजांची चमकदार कामगिरी

नाशिक चॅलेंजर्सची विजयी हॅट्ट्रिक
नाशिक : राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल सिझन- ६ मध्ये आठव्या सामन्यात नाशिक चलेंजर्सने स्टार वारिअर्सला चुरशीच्या लढतीत तीन धावांनी मात देत विजयाची हॅट्ट्रिक साधली. या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहिल्याने नाशिक चॅलेंजर्सला १३५ धावांच्या माफक लक्ष्याचे रक्षण करताना विजय मिळविता आला. नाशिक चॅलेंजर्सकडून ४ षटकांमध्ये २८ धावा देत तीन गडी तंबूत परत पाठवणारा सत्यजित बच्छाव सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
स्टार वॉरिअर्सचा कर्णधार मुर्तझा ट्रंकवाला याने नाणेफे क जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत नाशिक चॅलेंजर्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल्यानंतर सलामीवीर यासर शेख याच्यासोबत प्रशांत नाठे याने डावाची सुरुवात केली. परंतु त्यांना चांगली सुरुवात देता आली नाही. तिसऱ्या षटकांत समाधान पांगरेच्या एका भेदक चेंडूने प्रशांत ९ धावांवर खेळत असताना त्याचा त्रिफळा उडवला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विकास धोतरेने चार चेंडू खेळताना एक धाव न करता अमित मैंदच्या चेंडूवर योगेश यादव याच्या हाती झेल दिला. या सामन्यात घनश्यामलाही त्याच्या प्रतिमेला साजेशी खेळी करता आली नाही, तो १ धाव करून सोहमच्या चेंडूवर मुर्तझाच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. गौतम सूर्यवंशीने १३ धावा केल्या, तर विकास वाघमारेला योगेश यादवने गोलंदाजी करताना झेल देण्यास भाग पाडले. वाघमारेस आल्या पावली माघारी पाठवल्याने नाशिक चॅलेंजर्स संघाची अवस्था आणखीनच डळमळीत झाली असताना सातव्या क्रमांकावर मैदानात आलेल्या विनय भामरेने ४ चौकार आणि दोन षटकार ठोकून २६ चेंडूत ४२ धावा करून संघाची स्थिती सावरली. त्यांच्या नंतर सत्यजित बच्छावने १२ धावा करून धावसंख्येत भर घातली. तन्मय शिरोदे ३ व प्रतिकेश धुमाळ १ धाव काढून नाबाद राहिले. जितेंद्र काळेकर एकही धाव न काढता साजिन सुरेशनाथच्या चेंडूवर बाद झाला. नाशिक चॅलेंजर्सला विनय भामरे ४२ व यासर शेख ३५ धावांच्या जोरावर २० षटकांमध्ये ९ बाद १३५ धावांपर्यंत मजल मारता आली.
नाशिक चॅलेंजर्सकडून योगेश यादवने सर्वाधिक तीन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल १३६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदान उतरलेल्या स्टार वॉरिअर्सच्या डावाची सुरुवात करणारे ओमकार भवर व गालिब पटेल संघाला चांगली सुरुवात देण्यास अपयशी ठरले. तिसऱ्या क्रमांकावर आरिफ खानने ३६ चेंडूंचा सामना करीत ३ चौकार व २ षटकार फटकावत ४१ धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज संघाच्या धावसंख्येत विशेष भर घालू शकला नाही. मुर्तझाने १९ चेंडंूत १७ धावा केल्यानंतर विकासच्या चेंडूवर घनश्यामच्या हातात झेल देऊन तंबूत परतला. त्याच्यानंतर कोणताही फलंदाच संघाची पडझड सावरू शकला नाही. त्यामुळे नाशिक चॅलेंजर्सने दिलेले १३६ धावांचे लक्ष्य पार करताना स्टार वॉरिअर्सला अपयशाचा सामना करावा लागला.
( प्रतिनिधी)