नाशिक बाजार समितीला बसतोय दरराेज दहा लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 01:37 IST2021-05-17T01:36:59+5:302021-05-17T01:37:20+5:30
लॉकडाऊनमुळे बाजार समित्यांचे कामकाज बंद असल्यामुळे शेतीमालाची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. बाजार फीच्या रूपाने मिळणारे उत्पन्न बंद झाले असून, एकट्या नाशिक बाजार समितीला दररोज नऊ ते दहा लाख रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.

नाशिक बाजार समितीला बसतोय दरराेज दहा लाखांचा फटका
नाशिक : लॉकडाऊनमुळे बाजार समित्यांचे कामकाज बंद असल्यामुळे शेतीमालाची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. बाजार फीच्या रूपाने मिळणारे उत्पन्न बंद झाले असून, एकट्या नाशिक बाजार समितीला दररोज नऊ ते दहा लाख रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढत असलेली रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मागील बुधवारपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले असून, बाजार समित्या पूर्णपणे बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहेच; पण बाजार समित्यांचे आर्थिक उत्पन्नही घटले आहे. बाजार फीच्या रूपाने मोठ्या बाजार समित्यांना चांगले उत्पन्न मिळत असते. एकट्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याच्या माध्यमातून दरराेज सुमारे नऊ ते दहा कोटी रुपयांची उलाढाल होत असते तर बाजार फीच्या माध्यमातून बाजार समितीला सुमारे दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असते. गेल्या पाच-सहा दिवसांपासून आवक बंद झाल्याने बाजार समितीला या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.