नाशिक पुन्हा राज्यात नीचांकी
By Admin | Updated: December 5, 2015 23:19 IST2015-12-05T23:18:05+5:302015-12-05T23:19:09+5:30
पारा १२.५ अंश सेल्सिअसवर

नाशिक पुन्हा राज्यात नीचांकी
नाशिक : काही दिवसांपूर्वी निर्माण झालेले ढगाळ वातावरण पूर्णत: निवळल्याने शहरात थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असून, शहराच्या किमान तपमानाचा पारा शनिवारी राज्यात नीचांकी १२.५ अंश सेल्सिअसपर्यंत उतरला. नाशिकखालोखाल शनिवारी नागपूर व गोंदियात (१३.१) नीचांकी तपमानाची नोंद झाली.
गेल्या २० नोव्हेंबर रोजी शहरात मोसमातील नीचांकी तपमानाची नोंद (११.५) झाली होती; मात्र या दरम्यान आग्नेय व पूर्वमध्य अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह शहराला पावसाने झोडपून काढले होते. ढगाळ वातावरणामुळे शहराचा पारा वाढला होता. आता हे वातावरण पूर्णत: निवळल्याने पुन्हा तपमान घटण्यास प्रारंभ झाला आहे. गेल्या चार दिवसांत पाऱ्यात तब्बल पाच अंशांनी घसरण झाली आहे. त्यामुळे पहाटे व रात्री थंडीचा कडाका जाणवू लागला असून, नागरिक ऊबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत. बाजारात स्वेटर, कानटोप्या, कानपट्ट्या, स्कार्फ खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. शनिवारी नाशिकखालोखाल राज्यात नागपूर, गोंदिया (१३.१), पुणे (१४.८), जळगाव, अकोला, अहमदनगर (१५) असे किमान तपमान होते. (प्रतिनिधी)