फरार वैशाली वीर यांच्या मागावर आता नाशिक एसीबी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:19 IST2021-08-13T04:19:35+5:302021-08-13T04:19:35+5:30
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी नाशिकमध्ये येऊन जिल्हा परिषदेबाहेर यशस्वीरित्या सापळा रचून वैशाली वीर यांच्यारूपाने मोठा मासा गळाला लावला. ...

फरार वैशाली वीर यांच्या मागावर आता नाशिक एसीबी !
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी नाशिकमध्ये येऊन जिल्हा परिषदेबाहेर यशस्वीरित्या सापळा रचून वैशाली वीर यांच्यारूपाने मोठा मासा गळाला लावला. त्यांच्या आदेशान्वये तक्रारदाराकडून सुमारे आठ लाखांची रोकड घेताना शासकीय मोटार चालक संशयित ज्ञानेश्वर येवलेला रंगेहात पकडले. तसेच प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनाही अटक केली. मध्यरात्री एक वाजेपर्यंत सापळा कारवाई पथकाकडून वैशाली वीर यांची चौकशी व पडताळणी करण्यात आली होती. सकाळी वीर निसटल्याने सापळा पथकाची भंबेरी उडाली. त्यामुळे न्यायालयात रिमांड रिपोर्टमध्ये वीर यांना फरार दाखवावे लागले अन् संशयाची सुई ठाणे एसीबीच्या सापळा पथकाच्या दिशेने फिरली. दरम्यान, आता ठाणे सापळा पथकासह नाशिक एसीबीची दोन पथके झनकर-वीर यांचा समांतर शोध घेत आहेत.
--इन्फो--
दाखविला विश्वास अन् झाला विश्वासघात
सायंकाळनंतर महिला संशयिताला कायद्याने अटक करता येत नसल्याने पथकाने समन्स बजावून वैशाली वीर यांना सकाळी हजर राहण्याचे आदेशित केले. त्यांना हजर करण्याची हमी त्यांचे दीर आणि भावजय यांनी घेतली. सापळा पथकाने त्यांच्यावर विश्वास दाखविला अन् वैशाली वीर यांच्या निसटण्याचा मार्ग त्याचवेळी मोकळा झाला. कारण पथकाने त्यांच्या राहत्या निवासस्थानाबाहेर रात्रभर कडा पहाराही ठेवलेला नव्हता.
--इन्फो--
सापळा पथकाला फाजील आत्मविश्वास भोवला
ठाणे एसीबीच्या सापळा पथकाने कारवाई केल्यानंतर अतिरिक्त मदत म्हणून नाशिक परिक्षेत्राच्या एसबीच्या पथकाला सोबत घेतले असते, तर वाढीव मनुष्यबळाचा दबाव आणि नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकांच्या अनुभवाचा फायदा सापळा पथकाला झाला असता; मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. ठाण्याच्या पथकाला फाजील आत्मविश्वास भोवला. सापळा कारवाई जरी यशस्वी ठरली तरी, मुख्य संशयितावर अंकुश ठेवण्यास पथक सपेशल अपयशी ठरले.
--कोट--
ठाणे एसीबीच्या कारवाई सापळा पथकाने अतिरिक्त मदत मागितली असता, तत्काळ दोन पथके जिल्ह्यात झनकर यांच्या शोधार्थ रवाना केली आहेत. त्यांचे जवळचे नातेवाईक आणि ते जेथे जाऊ शकतात अशा सर्व ठावठिकाणांची माहिती घेऊन पथके कार्यरत आहेत. त्यांना अटक करण्यास पथकांना लवकरच यश येईल.
- सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, ला.लु.प्र. विभाग. नाशिक परिक्षेत्र