नाशिक @38.9
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 00:02 IST2016-05-19T23:38:19+5:302016-05-20T00:02:14+5:30
तपमानात घट : दमट हवामानामुळे नाशिककर घामाघूम

नाशिक @38.9
नाशिक : गेल्या बुधवारी शहराच्या तपमानाचा पारा ४१ अंशांवर पोहचला होता. यावर्षीची सर्वाधिक तपमानाची नोंद हवामान खात्याने केली. याबरोबरच हवेतील आर्द्रतेचे प्रमाणदेखील वाढत असल्याने उन्हाचा चटका अन् उकाड्यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. गुरुवारी (दि.१९) तपमानात काही प्रमाणात घट होऊन ३८.९ अंश इतके तपमान नोंदविले गेले.
शहराचे वाढते तपमान व दमट हवामानामुळे प्रचंड उष्मा जाणवत होता. उन्हाच्या तीव्र झळांबरोबरच मुंबईकरांप्रमाणे नाशिककरांचाही घाम निघाला. दमट हवामानामुळे रात्रीही उकाडा जाणवत असल्याने घरात बसणे कठीण झाले होते. मागील तीन दिवसांपासून सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हवेतील आर्द्रतेचे प्रमाण पन्नास ते साठ टक्क्यांपेक्षा अधिक होते, तर रात्री यामध्ये वाढ होऊन दमट हवामानामुळे उकाडा वाढला होता. त्यामुळे शीतपेय, वातानुकूलन यंत्र, पंखे, कुलर आदिंचा वापर सध्या शहरात वाढल्याचे चित्र दिसत आहे. यावर्षी ३४.३ (२४ एप्रिल) सर्वांत कमी तपमान नोंदविले गेले; मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहराच्या तपमानाचा आलेख चढता आहे. तपमानाचा पारा गुरुवारी काही अंशांनी कमी झाला असला तरीदेखील उन्हाची तीव्रता ही जाणवत होती. शहरात दिवसभर वाऱ्याचा वेग टिकून राहिल्यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही काहीसे कमी होण्यास मदत झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. यामुळे गुरुवारी नाशिककरांना दुपारनंतर उकाडा कमी जाणवला.