नासाकाचा हंगाम अडकला ‘तोडग्यात’

By Admin | Updated: June 10, 2014 00:38 IST2014-06-10T00:25:57+5:302014-06-10T00:38:06+5:30

कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्हा बॅँकेच्या प्रशासक मंडळासोबत चर्चा करून कारखाना सुरू करण्याबाबत सुवर्ण ‘तोडगा’ काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

NASA's season ends in 'settlement' | नासाकाचा हंगाम अडकला ‘तोडग्यात’

नासाकाचा हंगाम अडकला ‘तोडग्यात’

 

नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्याबाबत कामगार युनियन व सभासदांनी कारखाना कार्यक्षेत्रावर मेळावा घेऊन नासाका पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असतानाच, नाशिक साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्हा बॅँकेच्या प्रशासक मंडळासोबत चर्चा करून कारखाना सुरू करण्याबाबत सुवर्ण ‘तोडगा’ काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
रविवारीच नाशिक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर सभासद व कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होऊन मेळाव्यात कोणत्याही परिस्थितीत यंदाचा नासाकाचा गळीत हंगाम सुरू करायचाच, असा निर्धार करण्यात आला. नासाकाच्या कार्यक्षेत्रावर असलेली सुमारे ३५ कोटींची साखर विक्री करून जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे कर्ज फेडण्याबरोबरच नासाका कामगारांचे थकीत वेतन देण्याबाबत संचालक मंडळ व जिल्हा बॅँकेच्या वतीने संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाने कामगार, संचालक मंडळ व जिल्हा बॅँक यांचा संंयुक्त त्रिपक्षीय करार तयार केला असून, त्यावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतरच साखर विक्री व कामगारांचे वेतन निघण्याची शक्यता आहे; मात्र संचालक मंडळाने त्यास विरोध दर्शविताना, साखर विक्री करून जिल्हा बॅँकेचे कर्ज फेडलेच तर उर्वरित थकीत कर्ज व गळीत हंगामासाठी आवश्यक नऊ कोटींचा निधी कसा उभा करणार, असा सवाल उपस्थित केला आहे; तर जिल्हा बॅँकेने, नाबार्ड अथवा शासनाच्या हमीशिवाय पुन्हा कर्ज कसे देणार, असा पवित्रा घेतला आहे. त्यातही नासाकाचे काही संचालक सरकारकडे जाऊन नासाकासाठी सरकारी ‘हमी’ मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. नासाकाच्या एका पदाधिकाऱ्याने सोमवारी जिल्हा बॅँकेच्या प्रशासकीय मंडळाशी चर्चा करून नासाकाच्या गळीत हंगामासाठी जिल्हा बॅँकेने कर्ज द्यावे, बदल्यात आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही दिल्याचे समजते.
(प्रतिनिधी)

Web Title: NASA's season ends in 'settlement'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.