नासाकाच्या जीपचा लिलाव
By Admin | Updated: October 9, 2015 01:29 IST2015-10-09T01:28:42+5:302015-10-09T01:29:18+5:30
नासाकाच्या जीपचा लिलाव

नासाकाच्या जीपचा लिलाव
नाशिक : कारखान्याच्या कर्मचाऱ्याचे वेतन व बोनस देण्यास असमर्थ ठरलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या जप्त जीपचा अखेर नाशिक तहसीलदारांनी लिलाव करून त्यातून मिळालेली रक्कम कामगाराला अदा करण्याची कार्यवाही केली आहे. सुभाष रामचंद्र वडजे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, कारखान्यात नोकरी करीत असताना त्याचे वेतन व बोनस व्यवस्थापनाने दिले नाही म्हणून वडजे यांनी थेट कामगार उप आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली, परंतु त्यालाही दाद मिळत नसल्याचे पाहून कामगार न्यायालयात धाव घेऊन दावा दाखल केला. त्याची सुनावणी होऊन कारखान्याची मालमत्ता जप्त करून कामगाराची देणी चुकविण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार कामगार कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही कारवाई करण्याचा निर्णय घेऊन तहसीलदार गणेश राठोड यांनी नाशिक कारखान्याच्या मालकीची जीप (क्र. एम.एच. १५ बी. एन. ११५४) जप्त करून तहसील कार्यालयात उभी केली. या जीपच्या लिलावासाठी जाहीर निविदाही काढण्यात आली; परंतु पहिल्या प्रयत्नात लिलाव घेण्यासाठी कोणी पुढे न आल्याने फेर लिलाव करण्यात आला व काल एक लाख २० हजार रुपयांच्या बोलीत जीपची विक्री करण्यात आली. कामगार सुभाष वडजे यांचे कारखान्याकडे एक लाख आठ हजार ४५९ रुपये घेणे आहेत. त्यांना पैसे अदा केल्यानंतर उर्वरित रक्कम कामगार उप आयुक्तांकडे वर्ग करण्यात येणार आहे.