नासाकाचीही पेटणार ‘चिमणी’?
By Admin | Updated: August 25, 2016 01:01 IST2016-08-25T01:00:56+5:302016-08-25T01:01:14+5:30
आशा पल्लवित : १३९ कोटींच्या कर्जाचा डोंगर; पालकमंत्र्यांनी मागविली सहकार खात्याकडून माहिती

नासाकाचीही पेटणार ‘चिमणी’?
नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला जशी सरकारने थकहमी देऊन राज्य शिखर बॅँकेने हमी घेत जिल्हा बॅँकेमार्फत कर्ज देऊन बहुप्रतीक्षित वसाकाचा बॉयलर पेटविला, त्याच धर्तीवर आता नाशिक सहकारी साखर कारखानाही सुरू करण्यासाठी शासनानेच पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. एकीकडे सहकार संपविण्याचे आरोप भाजपा सरकारवर होत असताना दुसरीकडे भाजपाचे नेते जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नासाका सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.
त्याचसंदर्भात मंगळवारी (दि.२३) पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सहकार विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून नासाकाबाबत आवश्यक ती माहिती घेतल्याचे कळते. गेल्या दोन वर्षांपासून नासाकाचे संचालक मंडळ बरखास्त असून, नासाकाच्या
मालमत्तेवर जिल्हा बॅँकेचा ताबा आहे. यासंदर्भात जिल्हा बॅँकेकडून वेळोवेळी नासाकाच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याचे प्रयत्नही केले गेले आहेत. जिल्हा बॅँकेने नासाकाला ८४ कोटी ५१ लाखांचे कर्ज दिले असून, या कर्जाचे व्याज २९ कोटी ९२ लाख इतके झाले आहे. त्यामुळे आजमितीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे नासाकावर ११४ कोटी ४३ लाखांचे कर्ज आहे. याच कर्जाच्या वसुलीपोटी आतापर्यंत जिल्हा बॅँकेने नासाकाच्या ताब्यात असलेल्या ५७ हजार पोत्यांचा लिलाव करून त्यापोटी प्राप्त झालेली ९ कोटी ५० लाखांची रक्कम सर्वोेच्च न्यायालयात भरली आहे. अद्यापही नासाकाच्या गुदामात १३०० ते १४०० साखरेची पोती पडून आहेत. त्याचाही लिलाव जिल्हा बॅँकेने केला आहे. मात्र त्यापोटीची रक्कम संबंधित व्यापाऱ्याने जिल्हा बॅँकेत न भरल्याने ती साखरेची पोती अद्यापही नासाकाच्या गुदामात आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सहकार विभागाकडून नासाकात असलेल्या यंत्राबद्दल विचारणा केली असून, कारखाना सुरू करता येईल काय? यासह अन्य बाबींची माहिती घेतल्याचे समजते. गेल्या तीन वर्षांपासून नासाकाचे गाळप झालेले नाही. मात्र नासाकातील यंत्रणा सुस्थितीत असल्याची माहिती सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिल्याचे कळते. (प्रतिनिधी)