कर्जपरतफेड केल्यानंतरच नासाकाला नव्याने कर्जपुरवठा
By Admin | Updated: July 25, 2014 00:39 IST2014-07-24T23:16:34+5:302014-07-25T00:39:00+5:30
कर्जपरतफेड केल्यानंतरच नासाकाला नव्याने कर्जपुरवठा

कर्जपरतफेड केल्यानंतरच नासाकाला नव्याने कर्जपुरवठा
नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी कर्जपुरवठ्याबाबत जिल्हा बॅँकेचे प्रशासक मंडळही अनुकूल आहे. परंतु नाबार्डच्या कायदेशीर बंधनामुळे कारखान्याने मागील कर्जाची परतफेड केल्यानंतरच प्रशासक मंडळ नव्याने कर्जपुरवठ्याचा विचार करू शकेल, असे मत जिल्हा बॅँकेचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष ए. के. चव्हाण यांनी सभासदांच्या सहविचार सभेच्या सदस्यांसमोर मांडले. सभासदांच्या सहविचार सभेचे अध्यक्ष व कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद पां. भा. करंजकर यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी प्रशासक मंडळाचे अध्यक्ष ए. के. चव्हाण व तुषार पगार यांच्याशी चर्चा केली. यावेळी नासाकाच्या गळितासाठी बॅँकेने कर्ज उपलब्ध करून देण्याविषयी विविध बाजूंनी चर्चा झाली. कारखान्याकडील थकीत कर्जवसुलीसाठी बॅँकेस सरफेशी अॅक्ट २००२ अन्वये कारवाई करावी लागली आहे. अशा अवस्थेत कारखान्याचा एन.पी.ए. व अपुरा दुरावा नियमापेक्षा जास्त वाढल्याने नाबार्ड आणि राज्य बॅँक यांच्या परवानगीने तसेच शासनाची थकहमी मिळाली, तरच नव्याने कर्जपुरवठा करणे शक्य आहे. कारखान्याच्या १९३ एकर २० गुंठे जमीन क्षेत्रातील काही मालमत्ता विक्री करून कर्जपरतफेड केल्यास नव्याने कर्जपुरवठा करणे शक्य आहे. या मालमत्ता विक्रीबाबतचा प्रस्ताव राज्य साखर कारखान्याकडे पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, साखर विक्रीचा उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश न्यायालयाने रद्द ठरविला आहे. या अनुषंगानेच कामगार आयुक्तांचा निर्णय होईल. त्यामुळे या साऱ्या मुद्द्यांवरून आजतरी बॅँक नवीन कर्जपुरवठा करू शकेल, असे वाटत नसल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नासाका चालविण्याचा पुनर्विचार केला, तर कारखाना पूर्ववत सुरू होऊ शकेल, असे मत पां. भा. करंजकर यांनी व्यक्त केले.