आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदी नरेंद्रगिरी महाराज
By Admin | Updated: March 15, 2015 00:13 IST2015-03-15T00:12:21+5:302015-03-15T00:13:30+5:30
आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदी नरेंद्रगिरी महाराज

आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदी नरेंद्रगिरी महाराज
नाशिक : अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदी निरंजनी आखाड्याचे प्रमुख नरेंद्रगिरी महाराज यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. उज्जैन येथे झालेल्या राष्ट्रीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, उज्जैन व अलाहाबाद येथील आगामी कुंभमेळा नरेंद्रगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या निर्णयाद्वारे ‘आखाडा परिषदेचा अध्यक्ष मीच’ असा दावा करणाऱ्या महंत ग्यानदास यांना साधू-महंतांनी आव्हान दिले आहे. उज्जैन येथील बडा उदासीन आखाडा येथे देशभरातील आखाड्यांची बैठक शनिवारी झाली. या बैठकीत अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदी अलाहाबाद येथील निरंजनी आखाड्याचे प्रमुख नरेंद्रगिरी महाराज यांची, महामंत्रिपदी त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे प्रमुख हरिगिरीजी महाराज, तर प्रवक्तापदी मोहनदासजी महाराज यांची निवड करण्यात आली. महंत ग्यानदास हे मागील काही कुंभमेळ्यांत आखाडा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काही कुंभमेळे पार पडले; मात्र त्यानंतरही आखाडा परिषदेचे अध्यक्ष आपणच असल्याचा दावा महंत ग्यानदास करीत आहेत. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी बैठकाही घेतल्या. त्यांना आव्हान देण्यासाठी आखाडा परिषदेने उज्जैन येथे बडा आखाड्याचे प्रमुख रघुमुनीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बैठक घेऊन नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे.