नांदूरशिंगोटेत ५ गोण्या गुटखा जप्त
By Admin | Updated: August 27, 2016 00:09 IST2016-08-27T00:09:11+5:302016-08-27T00:09:28+5:30
नांदूरशिंगोटेत ५ गोण्या गुटखा जप्त

नांदूरशिंगोटेत ५ गोण्या गुटखा जप्त
सिन्नर : तालुक्यातल्या नांदूरशिंगोटे येथे नाकाबंदीत पीकअप जीपमध्ये सुमारे ५० ते ६० हजार रुपये किंमतीचा पाच गोण्या गुटखा जप्त करण्यात आला.
वावी पोलीस ठाण्याअंतर्गत नांदूरशिंगोटे येथे दूरक्षेत्र आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोलिसांकडून नाकाबंदी सुरु होती. पोलीस हवालदार पी. के. अढांगळे व डी. बी. दराडे यांनी नाकाबंदीदरम्यान संगमनेरकडून सिन्नरच्या दिशेने जाणारी पीकअप जीप (क्र. एम. एच. ४३ ए. डी. ४२५८) तपासणीसाठी थांबवली. या पीकअप जीपची तपासणी केल्यानंतर पोलिसांना त्यात हिरा कंपनीच्या गुटख्याच्या पुड्या असणाऱ्या पाच गोण्या मिळून आल्या.
नाकाबंदीसाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांना दिली. आंधळे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केल्यानंतर नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला घटनेची खबर दिली. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवून गुटख्याच्या गोण्या ताब्यात घेतल्या. या गोण्यांची किंमत अंदाजे ५० ते ६० हजार रुपये असल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली. राज्यात सर्वत्र गुटखा बंदी असतांना गुटख्याची सर्वत्र खुलेआम विक्री होत असल्याचे दिसून येते. चोरुन गुटखा वाहतूक केली जाते. वावी पोलिसांनी पडकलेल्या या मुद्देमालामुळे गुटखा विक्रीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)