नांदूर-मानूर रस्त्याची चाळण
By Admin | Updated: September 3, 2014 00:20 IST2014-09-02T22:29:49+5:302014-09-03T00:20:07+5:30
नांदूर-मानूर रस्त्याची चाळण

नांदूर-मानूर रस्त्याची चाळण
नाशिक : महापालिका हद्दीतील नांदूर- मानूर या सुमारे दोन किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्यावर खडी पसरल्याने येथून मार्गक्रमण करणे मुश्कील झाले आहे.
नांदूर ते जेलरोड रस्ता हा अलीकडे प्रचंड वाहतुकीचा रस्ता बनला आहे. जेलरोड आणि औरंगाबाद महामार्गाला जोडणारा हा रस्ता असल्याने या मार्गावरील वाहतूक वाढलेली आहे. शिवाय जेलरोडचा झालेला विस्तार आणि हॉटेल जत्रा मार्गावरील वाढलेली वसाहत यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. परंतु या रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता या रस्त्याला कुणी वाली आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
नांदूर फाट्यापासून ते जेलरोडवरील जनार्दन स्वामी पुलापर्यंतचा मार्ग अत्यंत खडतर बनलेला आहे. या मार्गावर काही गॅरेज, नागरी वसाहत, व्यापारी संकुल तसेच मनपाची शाळादेखील आहे. शिवाय नियमित वाहनांची वर्दळही सुरू असते. नाशिकरोडला आणि औरंगाबादा फाटा, तसेच हॉटेल जत्राकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो.
या मार्गावरील जनार्दन स्वामी पुलावरील रस्ता खडबडीत झाला आहे. मनपा शाळेसमोरील रस्ता खड्डेमय आहे, तर नांदूर गावच्या पुलापासून नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर खाचखळगे पडले आहेत. (प्रतिनिधी)
नांदूर नाका ते जेलरोड जनार्दन स्वामी पुलापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या कामात आत्तापर्यंत केवळ खडीकरण करण्यात आले आहे. रुंदीकरण करण्यात येणाऱ्या मार्गावरील खडीही आता उखडली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रुंदीकरण सुरू करण्यात आले होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे कामच बंद पडले आहे. नांदूर नाक्यावर वर्षभर अनेक कार्यक्रम घेतले जातात; परंतु रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कुणीही बोलण्यास तयार नाही.
जेलरोड येथील जनार्दन स्वामी पूल हा खड्ड्यांमुळे धोकेदायक बनला आहे. संपूर्ण पुलावरील रस्ता उखडला असून, वाहनांना येथून हळूहळू वाहने चालवावी लागत आहेत. खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचत असल्याने वाहने नेताना अंदाज न आल्यामुळे चालकाचा वाहनांवरील ताबा सुटण्याचाही धोका संभवतो.