नांदूरमधमेश्वरला मिळाला रामसर दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:28 AM2020-01-26T00:28:25+5:302020-01-26T00:28:42+5:30

नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची ‘रामसर’च्या दर्जाची प्रतीक्षा अखेर संपली. केंद्रीय पर्यावरण समितीने याबाबतची घोषणा ...

Nandur Madheshwar got Ramsar status | नांदूरमधमेश्वरला मिळाला रामसर दर्जा

नांदूरमधमेश्वरला मिळाला रामसर दर्जा

Next
ठळक मुद्देराज्यातील एकमेव स्थळ : आंतरराष्टÑीय स्तरावर नाशिकची नवी ओळख

नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची ‘रामसर’च्या दर्जाची प्रतीक्षा अखेर संपली. केंद्रीय पर्यावरण समितीने याबाबतची घोषणा शनिवारी (दि. २५) केली. त्याचे पत्र लवकर नाशिक वन्यजीव विभागाला प्राप्त होणार आहे. नाशिकचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनीही यास दुजोरा दिला आहे.
दोन वर्षांपूर्वी वनविभागाने राज्य व केंद्र सरकारला याबाबतचा सादर केलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पाणथळ म्हणून हे राज्यातील पहिले ठिकाण ठरले..
गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर अभयारण्याला रामसरचा दर्जा मिळावा, यासाठी वनविभागातर्फे पाठपुरावा सुरू होता. स्वीत्झर्लंडच्या रामसर सचिवालयाकडे केंद्र सरकारने गेल्या महिन्यात प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती नाशिक वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली आहे.
सध्या देशातील २६ पाणथळांच्या यादीत नांदूरमधमेश्वरचा समावेश आहे. सस्तन वन्यजीवांच्या आठ, तर चोवीस प्रजातींचे मासे, २६५ पेक्षा जास्त देशी-विदेशी पक्षी, पाचशेपेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार, ४१ प्रजातींचे फुलपाखरू आणि विविध पाणवनस्पती अशी जैवविविधता या अभयारण्यात आहे. रामसरमध्ये आढळणाºया १४८ स्थलांतरित पक्षांपैकी ८८ प्रजाती नांदूरमधमेश्वरमध्ये पहावयास मिळतात.
शिवाय देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या २६५ प्रजाती असून, दरवर्षी वीस हजारांपेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद तिथे होत असल्याची बाजू प्रस्तावात जमेची ठरली आहे.
नांदूरमधमेश्वरला हा दर्जा प्राप्त झाल्याने वैभवशाली पाणथळांच्या ठिकाणांत नाशिकची जगाच्या नकाशावर नवी ओळख निर्माण होईल. रामसरचा दर्जा मिळाल्याने येथील पर्यटनाला अधिक चालना मिळणार असून, आंतरराष्ट्रीय पर्यटकांची पावले इकडे वळण्याचा मार्ग खुला झाला. संवर्धनासह वन्यजीव अभयारण्याचे संरक्षण अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Nandur Madheshwar got Ramsar status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.