नांदूर-चास रस्त्याची दुरवस्था
By Admin | Updated: November 23, 2014 23:11 IST2014-11-23T23:11:02+5:302014-11-23T23:11:18+5:30
नांदूर-चास रस्त्याची दुरवस्था

नांदूर-चास रस्त्याची दुरवस्था
नांदूरशिंगोटे : नांदूरशिंगोटे - चास -नळवाडी-कासारवाडी या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. नांदूरशिंगोटे व चास ही दोन्ही गावांमध्ये जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी असतानाही या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर नांदूरशिंगोटे, चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी आदिं गावे आहेत. सिन्नर व अकोले तसेच संगमनेर तालुक्याच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नांदूरशिंगोटे ते चास या रस्त्याची गेल्या ४ ते ५ वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. काही ठिकाणी डांबर उखडले आहे, तर अनेक ठिकाणी रस्ता अक्षरश: खचून गेला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्गापासून जाणाऱ्या नांदूरशिंगोटे ते चास या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे सुमारे दहा वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. नाशिक जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील या रस्त्याकडे दहा वर्षांत पुन्हा लक्ष देण्यात आलेले नाही. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था आणखी बिकट होते. रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागते.
सदर रस्ता पुढे अकोले व संगमनेर तालुक्यांत जात असल्याने याठिकाणी वाहनांची वर्दळ जास्त असते. तथापि, रुंदी कमी झाल्याने या रस्त्याने एकावेळी एकच वाहन चालण्यास जागा राहिली आहे. अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रसंग नित्याचे झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारात नेण्यासाठीही हाच रस्ता सोयिस्कर असल्याने या मार्गे अवजड वाहनांचीही वर्दळ नेहमीचीच झाली आहे.
गेल्या वर्षी खासदार निधीतून या भागातील चास-नळवाडी, कासारवाडी-चास, नळवाडी-कासारवाडी आदि एकेक किलोमीटरचे रस्ते मंजूर झालेले असतानाही त्यांची कामे अपूर्ण आहेत. या भागात दोन जिल्हा परिषद सदस्य असतांनाही रस्त्यांच्या कामाबाबत पाठपुरावा होत नसल्याने भोजापूर खोरे व नांदूरशिंगोटे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नांदूरशिंगोटे ते चास या महत्त्वाच्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी जगनपाटील भाबड, शंकर सानप, आनंदा शेळके, शंकर शेळके, पोपट शेळके, शिवाजी दराडे, रावसाहेब दराडे, दीपक बर्के, बाळासाहेब देशमुख, सुनील खैरनार, संजय खैरनार, सुभाष दराडे, राजेंद्र शेळके, मंगेश शेळके, भारत दराडे, सुदाम आव्हाड आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)